डोंबिवली : डोंबिवलीतील ज्येष्ठ पत्रकार श्रीराम कांदू यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणाची दखल विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी घेतली आहे. या प्रकरणाची उचित कार्यवाही करावी असे निर्देश ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका पत्रकार संघाने या प्रकरणाचा जलदगतीने तपास व्हावा अशी मागणी झिरवळ यांच्याकडे एका पत्रान्वये केलीय.
दि ३ फेब्रुवारी २०२२ रोजी पत्रकार कांदू यांच्यावर दोन तरूणांनी हल्ला करीत मारहाण केली हेाती. या हल्ल्यात ते किरकोळ जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने विशाल उर्फ बबन खांडेकर अमोल सावंत श्याम उर्फ हिरू रेवणकर या तिघांना अटक केली आहे. मात्र या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार अजूनही पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. त्यामुळे हा हल्ला कोणत्या कारणातून झाला याचाही उलगडा झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश तांबे यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे एका पत्रान्वये केली आहे.
पत्रकारांवरील हल्ले थांबलेले नाहीत…
पत्रकार हा लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. मात्र समाजकंटक व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोककांकडून आजही पत्रकारांवर सातत्याने हल्ले होत आहेत, राज्यातील पत्रकारांवरील जीवघेणे हल्ले अजूनही थांबलेले नाही. पत्रकारांच्या संरक्षणासंदर्भात राज्यातील पत्रकार संघटनांकडून अनेकवेळा राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने विधीमंडळात अनेकवेळा चर्चा झाली आहे. पत्रकारांवरील वाढते हल्ले लक्षात घेऊन पत्रकार आणि प्रसारमाध्यम संस्थांना संरक्षण देणारे विधेयक महाराष्ट्र विधानसभेत मंजूर करण्यात आलं आहे. मात्र तरीही पत्रकारांवरील हल्ले थांबलेले नाही. त्यामुळे पत्रकारांवर हल्ला करणा-यांवर कठोर कारवाई व्हावी याकडे पत्रकार संघाचे अध्यक्ष तांबे यांनी विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांचे लक्ष वेधलय.