डोंबिवली : डोंबिवलीतील फडके रोडवरील उर्मी हॉटेलमध्ये गेल्या अकरा महिन्यात 7 लाख 59 हजार रुपये किंमतीची 46 हजार 523 युनिट विजेची चोरी झाल्याचा प्रकार महावितरणच्या कारवाईत उघडकीस आला आहे. याप्रकरणी हॉटेल चालक पुनीत शहा याच्याविरुद्ध कल्याण (पश्चिम) येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणच्या कल्याण परिमंडलात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम सुरु आहे. या मोहिमेंतर्गत फडके रोडवरील लक्ष्मी बाग इस्टेट येथील उर्मी हॉटेलच्या (वीज बिलावरील नाव स्प्लेंडर शेल्टर प्रा. लि.) मीटरची तपासणी करण्यात आली. मीटरचा डिस्प्ले नादुरुस्त झाल्याचे व मीटरशी छेडछाड केल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे हे संशयित मीटर ताब्यात घेऊन ग्राहकासमक्ष महावितरणच्या कार्यालयात अधिक तपासणी करण्यात आली. यात अतिरिक्त सर्किटच्या माध्यमातून मीटर बायपास करून वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले. सहायक अभियंता योगिता कर्पे यांच्या फिर्यादीवरून हॉटेल चालक पुनीत शहा याच्या विरुद्ध वीज कायदा 2003 च्या कलम 135 नुसार वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उप निरीक्षक रज्जाक शेख या गुन्ह्याचा तपास करत आहेत. दरम्यात हॉटेल चालकाने चोरी केलेल्या विजेचे 7 लाख 59 हजार रुपयांचे बिल भरले आहे व दंडाच्या आकारणीची मागणी केली आहे. डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद पाटील, सहायक अभियंता योगिता कर्पे व संतोष बोकेफोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.