डोंबिवली : कोरोनाच्या दुस-या लाटेनंतर बंद झालेली नाटयगृहाचा पडदा अखेर शनिवारी उघडला आणि तिसरी घंटाही वाजली. राज्यातील पहिल्या नाट्यप्रयोगाचा मान सांस्कृतिक उपराजधानी असणाऱ्या डोंबिवलीला प्राप्त झाला. इथल्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. हा पहिलाच प्रयोग हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून आले.
राज्य शासनाच्या निर्देशानंतर शनिवारपासून नाटयगृहे उघडण्यात आली. त्यामुळे नाटय रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळालं. डोंबिवलीच्या सावित्रबाई फुले रंगमंदिरात प्रशांत दामले यांचे एका लग्नाची दुसरी गोष्ट या नाटकाचा प्रयोग पार पडला. कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या नाटय रसिकांनी नाटय प्रयोगासाठी गर्दी केली होती. या प्रयोगासाठी कल्याण डोंबिवलीसह मुंबई, ठाणे, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसरातील नाट्यप्रेमी सहकुटुंब दाखल झाले होते.
नाटयगृहाच्या भाडयात सूट द्या .. प्रशांत दामले
कोरोना काळात नाटयक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे यासाठी नाटयकर्मींनी राज्य शासनाकडे मदतीचे मागणी केलीय. नाटयक्षेत्राला पून्हा उभारी मिळण्यासाठी राज्य शासनाने विविध सोयी सुविधा वाढवून देण्यासह 2022 पर्यंत नाट्यगृहांच्या भाड्यात सूट द्यावी अशी अपेक्षा सुप्रसिद्ध नाट्यकर्मी आणि कलाकार प्रशांत दामले यांनी व्यक्त केली. नाटयक्षेत्र बंद असल्याने नवीन कलाकार सिरीयलकडे वळल्याची चिंताही दामले यांनी व्यक्त केली.
खराब रस्त्याचा त्रास, पण प्रयोगाची रंगत औरच : कविता लाड
कल्याण डोंबिवली परिसरातील रस्त्यावरील खड्डय़ांची समस्या सध्या खूपच गाजत आहे मात्र खड्डयांचा फटका नाटयकर्मींना बसला आहे. डोंबिवलीत प्रयोगाच्यावेळी येताना खड्डयांचा खूपच त्रास झाला अशी नाराजी एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकातील ज्येष्ठ नाटय़ अभिनेत्री कविता लाड यांनी व्यक्त केली. खड्डयांचा त्रास झाला असला तरी इथ आल्यानंतर प्रयोगाची रंगत औरच असते. आम्हाला नेहमी येथे आल्यानंतर खूपच आनंद मिळतो. इथले प्रेक्षक मराठी नाटकावर भरभरून प्रेम करतात. कोरोना काळाच्या गॅपनंतर पुन्हा एकदा नाटय़क्षेत्र सुरू झालय. त्यामुळे रसिकांच्या भेटीची ओढही जितकी आम्हाला तितकीच आमच्या भेटीचीही त्यांना असते असेही लाड म्हणाल्या.