डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या डोंबिवली जवळच्या गोळवली गावात गाडी पार्किंगच्या वादातून ट्रक चालकासह चौघा दुचाकीस्वारांमध्ये वाद झाला. दोन्ही गटांमध्ये झालेला वाद टोकाला गेल्यानंतर दुचाकीस्वार तरूणांच्या टोळक्याने गोदामातील कामगारांसह 35 वर्षीय बबलू गुप्ता याला बेदम मारहाण केली. गोदामातील कामगार पळून गेले. मात्र या घटनेनंतर बबलू गुप्ता या गोदाम मालकाचा उपचारांच्या दरम्यान मृत्यू झाल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण परसरले आहे.
डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या कल्याण-शिळ महामार्गावरील गोळवली परिसरात बबलू बद्रीनाथ गुप्ता याचे पेपरचे गोदाम आहे. 13 ऑगस्टच्या रात्री मोहम्मद जहागीर नावाचा चालक पेपरने भरलेली पिकअप गाडी घेऊन गोदामासमोर आला. या गोदामासमोर तीन-चार दुचाकी उभ्या होत्या. त्यावर काही तरुण बसले होते. चालकाने त्या तरुणांना दुचाकी बाजूला करा मला त्याठिकाणी पिकअप गाडी उभी करायची असल्याचे सांगितले. चालक गाडी मागे-पुढे करत असताना त्या तरुणांचा आणि चालकाचा वाद झाला. या वादाचे रुपांतरण हाणामारीत झाले. कामगार आणि बबलू गुप्ता हे गोदामातून बाहेर आले. तोपर्यंत तरुणांच्या टोळक्याने जवळपास 20 पेक्षा जास्त अन्य तरुणांना बोलावून घटनास्थळी बोलावून घेतले होते. पुन्हा तरुणांच्या टोळक्याने गोदामातील कामगारांसह बबलू गुप्ता याला मारहाण केली. गोदामातील कामगार गोदाम सोडून पळून गेले. त्यामुळे बबलू एकाकी पडला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी बबलू गोदामासमोर बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला. त्याला रुग्णलायात दाखल केले. तथापी उपचारांदरम्यान बबलूचा मृत्यू झाला. पोलिसांनी बबलूचा मृतदेह तर या तपासणीकरिता केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटल ला पाठवून दिला.
उत्तरीय तपासणी अहवालाची प्रतीक्षा
मानपाडा पोलिसांनी हाणामारी करणाऱ्या दोन्ही गटांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले. बबलूचा मृत्यू मारहाणीमुळे झाला आहे का ? हे उत्तरीय तपासणी अहवालातून स्पष्ट होणार आहे. पोलिस अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. बबलूच्या अंगावर गॅस सिलेंडरचा टाकला होता. शिवाय तो आजारी देखील होता. या प्रकरणी काही तरुणांना ताब्यात घेतले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.