मानपाडा पोलिसांची कारवाई : गोवा येथून महिलेसह, साथीदाराला अटक, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

डोंबिवली : फेसबुकवर मैत्री करून प्रेमाच्या जाळयात ओढून एका महिलेने अनेकांना लाखो रूपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी त्या महिलेस तिच्या साथीदाराला अटक केली आहे. समृध्दी खडपकर (वय २९ वर्षे ) आणि विलेंडर विल्फड डिकोस्टा, (वय ३४ वर्षे ) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

मुंबईतील खार येथे राहणारी समृध्दी हिने फेसबुकच्या माध्यमातून महेश पाटील यांच्याशी मैत्री केली. त्यानंतर समृध्दी हिने पाटील यांना खोणी गावातील एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावून बोलावले. हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर त्यांना गप्पांमध्ये गुंतवून ठेवले. त्यानंतर त्यांच्यावर प्रेम करते असे सांगून, त्यांना हॉटेलच्या खोलीत घेऊन गेली. पाटील हे बाथरूममध्ये गेल्याची संधी साधून तिने त्यांच्याकडील परवानाधारक पिस्तूल, सॅमसंग फोल्ड–३ मोबाईल, सोन्याच्या तीन चैन, हातातील सोन्याचे कडे, एक टायटन कंपनीचे घडयाळ असा ४,७५,००० /- रु चा ऐवज चोरून तेथून पळून गेली.

सदर महिलेचा कोणताही मोबाईल फोन नंबर अथवा तिचा कोणताही पत्ता पाटील यांच्याकडे नव्हता. पाटील यांनी त्याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला होता. चोरलेल्या पिस्तुलचा ही महिला गैरवापर करण्याची दाट शक्यता होती. त्यानुसार पोलिसांची तपासाची चक्रे फिरली. मानपाडा पोलिसांनी फेसबुकच्या माध्यमातून त्या महिलेचा मुंबईतील खार येथे शोध घेतल्यानंतर ती महिला गोवा येथे पळून गेल्याचे समजले. पोलिसांनी गोवा येथून त्या महिलेला आणि तिच्या साथीदाराला अटक केली.

हि कारवाई पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाययक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनि शेखर बागडे, सपोनिरी अविनाश वनवे, सपोनिरी सुनिल तारमळे, पोहवा सुशांत तांबे, सुनील पवार, राजेंद्रकुमार खिल्लारे, दिपक गडगे, विकास माळी, पोना शांताराम कसबे, यल्लपा पाटील, देवा पवार, प्रवीण किनरे, बालाजी गरूड, अरूणा चव्हाण, प्राजक्ता खैरनार यांच्या पथकाने केली.

दारूमध्ये गुंगीचे पदार्थ टाकून लुटत …

सदर महिला फेसबुकच्या माध्यमातून अनेकांशी संपर्क करून विश्वास संपादन करीत. त्यांच्याशी मैत्री करीत, त्यानंतर त्यांना वेगवेगळया हॉटेलमध्ये बोलावून त्यांना दारूमध्ये गुंगीचे पदार्थ टाकून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन अशा वस्तू चोरी करून पळून जात असत. बदनामीच्या भितीने अनेकजण तक्रार करीत नसल्याने तिचे मनोबल वाढले होते. तसेच चोरलेल्या वस्तू ती तिचा साथीदार विल्फड डिकोस्टा हा गोवा येथे विकत असे. अनेकांची फसवणूक केल्याची कबुली तिने पोलीस चौकशीत दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *