डोंबिवलीत इमारतीच्या पिलरला तडे : २२ कुटुंबीय धास्तावले
डोंबिवली : पूर्वेकडील सुनीलनगर मधील डी.एन.सी. रोडवरील ओम शिव गणेश इमारतीच्या दुरूस्तीचे काम सुरू असतानाच, इमारतीच्या पिलरला तडे गेल्याचा प्रकार घडलाय. त्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरलीय. सध्या इमारतीत राहणे धोकादायक असल्याने पालिकेने त्या रहिवाशांना नातेवाईकांकडे राहण्यास सांगितले आहे.
ओम शिव गणेश इमारतीला २५ वर्ष पूर्ण झाले असून या इमारतीती २२ कुटुंबीय राहतात. इमारतीचे स्ट्रक्चर ऑडीट करण्यात आलय. प्रत्येक रहिवाशांनी प्रत्येकी ४० हजार रूपये भरून इमारत दुरूस्तीचे काम दिलय अशी माहिती रहिवाशी कैलास पवार यांनी दिली. गेल्या दोन महिन्यांपासून इमारतीच्या दुरूस्तीचे काम सुरू असतानाच इमारतीच्या पिलरला तडे गेल्याचा प्रकार घडलाय. हा प्रकार समजताच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, स्थायी समिती सभापती राहूल दामले, शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी इमारतीची पाहणी केली. रहिवाश्यांची सुरक्षा महत्वाची असून, त्यादृष्टीकोनातून पालिका प्रशासनाने निर्णय घ्यावा असे राज्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. तर इमारतीचे दुरुस्तीचे काम चुकीच्या पद्धतीने केल्याने पिलरला तडा गेल्याचे नगरसेवक म्हात्रे यांनी सांगितले. पालिकेचे उपअभियंता महेश गुप्ते यांनी सांगितले की, सध्या रहिवाशांना इमारतीत राहण्यास धोका असल्याने त्यांना काही दिवस नातेवाईकांकडे राहण्याचा सल्ला देण्यात आलाय.