कलेतून समाजसेवेचा वसा जपणारं एक नाव उदय अरविंद इंदप ..

डोंबिवली/ संतोष गायकवाड :   कलेतून समाजसेवेचा वसा जपणारी मंडळी थोडी थोडकीच असतात. डोंबिवलीतील उदय अरविंद इंदप हे त्यापैकीच एक नाव. डोंबिवली ही कलेची नगरी म्हणून ओळखली जाते. पण या कलेच्या नगरीत कलेवर प्रेम करणाराच नव्हे, तर कलेतून समाजसेवेचा वसा जपणारा हा अनोखा कलाकार ठरलाय.  लग्नाचे सेट असो वा सिनेमाचे सेट असे आव्हानात्मक सेट उभारण्याच्या लिलया उदय इंदप यांनी सहजरित्या पार पाडल्यात. हे सेट उभारण्यासाठी लाखो-कोटयावधी रूपये खर्च केले जातात. मात्र त्यानंतर हे सेट तुटले जातात. क्षणभराचा हा आनंद असतो. याचं दु:ख कलाप्रेमी उदय इंदप यांच्या मनाला नेहमीच बोचत असे. त्यामुळे त्यांनी लाखो कोटयावधीचे सेट उभारण्यापेक्षा समाजजीवनावर प्रकाश टाकणारे आणि समाजातील विविध स्तराच्या व्यथा मांडणारे सेट उभारण्याचे ठरवले. गेल्या २९ वर्षापासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. शेतक- यांची आत्महत्या असो चला शाळेत जाऊया अथवा नैसर्गिक आपत्ती असो वा नेत्रदान असे समाजात प्रबोधन करणारे सेटच आता ते उभारीत आहेत. यासाठी ते स्वत:चे पैसेही खर्च करतात. त्यांचे वडील अरविंद इंदप हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख होते. त्यामुळे वडीलांच्या समाजसेवेची परंपरा उदय इंदप यांनी कलेच्या माध्यमातून जपलीय..

 

उदय इंदप यांनी कोणत्याही संस्थेतून कलेविषयीच कोणतंही प्रशिक्षण घेतलंल नाही. मात्र त्यांनी उभारलेलं राजमहल, राजवाडे, सामाजिक विषयावर रेखाटलेले मोठ मोठं सेट पाहिल्यानंतर, व्वा क्या बात है … असेच शब्द प्रत्येकाच्या तोंडातून बाहेर येतात. इतकं अप्रतिम सेट ते उभारतात. टाकाऊ पासून टिकावू बनविण्यात त्यांचा हातखंडा आहे. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी हर्षद मेहता यांनी लुटलेल्या पैशाचा देखावा उभारला होता. त्या दिवसापासून ते या क्षेत्राकउे वळलेत. २९ वर्षे कलाक्षेत्रात कार्यरत असून सामाजिक विषयावरील सेट उभारतात. इंटेरिअर डिझाइन क्षे़त्रात त्यांचा हातखंडा आहे. अनेकांची घरे जणूकाय राजमहालच अशा प्रकारे त्यांनी सजवली. पण त्यासाठी इतकेच पैसे हवेत असा अट्टाहास त्यांनी कधीच केला नाही. देतील ते पैसे त्यांनी स्वीकारलेत. टाकाऊ वस्तूपासून त्यांनी अनेक सामाजिक सेट उभारलेत. कलेतून अशीही समाजसेवा करू शकतो असा आदर्श त्यांनी समाजापुढं उभा केलाय.

  

 

उदय इंदप यांचे बालपण हे ठाण्यातील वर्तकनगर भागात गेले. त्यांचे वडील अरविंद इंदप हे शिवसेनेचे तालुका प्रमुख होते. त्यामुळे त्यांच्या घरी नेहमीच लोकांची ये- जा असायची. लोकांच्या अडीअडचणीच्यावेळी व प्रसंगाच्यावेळी वडील नेहमीच धावून जात व व त्यांची त्या प्रसंगातून सुटका करीत असत. उदय हे लहानपणापासून पाहत आलेले. त्यामुळे वडीलाचा समाजसेवेचा गुण त्यांच्या अंगी आला. आणि वडीलांच्या समाजसेवेची परंपरा त्यांनी कलेच्या क्षेत्रातून जपत आहेत. उदय यांच्या शेजारी राहणारे ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत हे राहत होते. त्यावेळी सावंत हे मार्मिकमध्ये कार्टून काढायचे. पंढरीनाथ सावंत यांच्यापासून उदय यांना चित्रकलेची आवड निर्माण झाली. मांडीवर बसून ते उदय यांना चित्र काढायला शिकवत असत. आणि त्यानंतर उदय हे कलेच्या प्रेमात रमून गेले. पंढरीनाथ सावंत हे माझया कलेतील गुरूवर्य असल्याची भावना इंदप व्यक्त करतात. सुप्रसिध्द कलादिग्दर्शक संजय धबडे यांच्याकडेही उदय यांनी काही दिवस असिस्टंट म्हणूनही काम केलय. कलेच्या क्षेत्रात काम करीत असताना शिक्षक तज्ञ सुरेंद्र वाजपेयी सर, केडीएमसीतील सभागृहनेता राजेश मोरे, डॉ अरूण पाटील यांचा नेहमीच पाठींबा मिळाल्याचे उदय सांगतात. उदय यांचा सामाजिक आदर्श पाहून त्यांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळावा यासाठी कै सुरेंद्र वाजपेयी सरांनी स्वत: धडपडही केली होती.

   

कलेतून समाजसेवा जपण्याचं अवघड काम आजही उदय इंदप हे जोपासत आहेत. साधी राहाणी, कलेच्या क्षेत्रात नवनवीन करण्याची धडपड असा त्यांचा गुणविशेष. त्यांच्या सामाजिक सेवेच्या स्वभावामुळे कुटूंबातील अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. पण अनेक अडचणींवर मात करीत उदय यांची कला दिवसेंदिवस बहरत आहे. जीवनात नातेसंबधातही अनेकवेळा संघर्ष करावा लागला. पण कलेवर त्याचा जराही परिणाम त्यांनी होऊन दिला नाही. कला ही त्यांचा जीव कि प्राण झालीय. कलेच्या प्रेमात रममाण झाले असताना अनेकवेळा ते कुटूंबाचेही भान विसरून जातात. मात्र त्यांच्या या कलेला त्यांच्या पत्नी संगीता इंदप यांची नेहमीच साथ मिळाल्याने कुटूंब सांभाळण्याची मोठी जबाबदारी तिनेच पार पाडलीय असे इंदप पत्नी विषयी अभिमानाने सांगतात. उदय यांना अनेक पुरस्कार मान सन्मान मिळाले आहेत. जनतेच्या शाबासकीची, कौतुकाची थाप आजही त्यांच्या पाठीवर आहे. पण त्यांच्या या कलेची राज्य सरकारकडून दखल घेतलेली नाही हिच खरी खंत आहे.

कलाकार हा दुस-याचे दु:ख आपल्या कलेतून समाजासमोर मांडत असतो मात्र त्यांच्या स्वत:च्या दु:खाकडे कोणीच लक्ष देत नाहीत. तसाच प्रकार उदय यांच्या बाबतीत घडलाय. पण कला विकणं हे उदय यांना मान्य नाही. त्यामुळे पैशासाठी त्यांनी कधीच काम केलं नाही. मोठ मोठं सेट उभारून त्यांनी लाखो कोटयावधी रूपये कमावले असते. गाडी, बंगला सगळयाच ऐषोआरामाची लोळण त्यांच्या पायावर पडली असती. पण या सगळयांना मूठमाती देत त्यांनी कलेतून केवळ समाजसेवा जपलीय. आणि जपण्याचे काम करत आहेत. जनतेने त्यांच्या कामाची दखल घेतलीय राज्य सरकारने घ्यावी हीच अपेक्षा… आज ४ फेब्रुवारी उदय अरविंद इंदप यांचा  वाढदिवस. त्यांच्या या वाढदिवशी अशा अनोख्या कलाकाराचे सिटीझन जर्नलिस्टकडून अभिष्टचिंतन. त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांची कला समाजासाठी बहरत राहो याच शुभेच्छा.

 

3 thoughts on “कलेतून समाजसेवेचा वसा जपणारं एक नाव उदय अरविंद इंदप ..”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!