डोंबिवली. : डोंबिवली म्हणजे सांस्कृतिक नगरी आणि गुणीजनांची मांदियाळीच आहे. अशा या पुण्य नगरीत, आपल्या २ नवीन कथा संग्रहाचं प्रकाशन (शिंपल्यातले मोती, अंतहीन अंधार यात्रा) आणि ३२ पुस्तकांचं (यांत ६ छोट्या पुस्तकांचे मिळून एक पुस्तक.) पुनःप्रकाशन एकाच वेळी करण्याचा अनोखा विक्रम केला आहे डोंबिवलीकर लीलाताई शहा यांनी !
मूर्ती लहान पण किर्ती महान, अश्या दिसायला छान व चुणचुणीत आणि वय वर्षे केवळ ८७ असलेल्या या गोड आजी, म्हणजे लीला शहा ! लीलाताईंनी वयाच्या १६ व्या वर्षी आपल्या लेखनाचा श्रीगणेशा केला. १९५२ साली लोकसत्तेत ‘लगीन घाई’ ही त्यांची पहिली कविता छापून आली, आणि त्यांच्या लेखन प्रवासाला गती मिळाली. ‘गीत ज्ञानेश्वर’ हे त्यांचं पहिलं पुस्तक १९८४ साली प्रकाशित झालं. त्यानंतर मग बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत, विविध विषयांवरील अशी ६८ पुस्तकं आजवर त्यांनी लिहिली. लीलाताईंच्या मातोश्री रतनबाई शिवलाल शहा ह्या संपूर्ण भारतात, जैन समाजातील पहिल्या कीर्तनकार, म्हणून ओळखल्या जातात . पणजोबा, आजोबा, आई हे कीर्तनकार व कवी, पूर्वापार चालत आलेली ही साहित्यसेवेची परंपरा लीलाताईंनी पुढे सुरु ठेवली आहे . त्यांनी स्वतः २०० गाणीसुद्धा लिहिलीत, ‘गीत बाहुबली, गीत महावीर, गीत ज्ञानेश्वर’ अशा गीतांना, विविध रागात व चालीत बांधून व गाऊन त्याचे असंख्य कार्यक्रमही लीलाताईंनी केलेत.
लीलाताईंना आत्तापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या ३ पुरस्कारांसह, ८५ विविध पुरस्कार मिळालेत. २०१७ ला अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलनाचे मानाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते. लीलाताईंच्या ही ३२ पुस्तकं पुनःप्रकाशित केलीत वाईच्या महावीर बुक एजन्सीचे राकेश शहा यांनीच ! शहा हे त्यांचे केवळ आडनावबंधू ! एकाच वेळी ३२ पुस्तकं पुनःप्रकाशित होण्याचा हा विक्रम झाला म्हणून पाठवणार लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्सला आहे, याआगोदरचा विक्रम २५ पुस्तकांचा पुनःप्रकाशित सोलापूरच्या सुरेखा शहा यांचा आहे. हा आता मोडला गेला डोंबिवलीच्या लीला शहा यांच्याकडुन.
या वर्षाअखेरीस लीलाताईंची ९ नवीन पुस्तके वाचकांच्या भेटीला येत आहेत. बालसाहित्य, कविता,कथा, कादंबर्या, हटके खाऊ, चरित्र अशी चौफेर साहित्यिक मुशाफिरी करणाऱ्या या शब्दशारदेला शतशः प्रणाम!