डोंबिवली : सुशिक्षित, सुसंस्कृत चाकरमण्यांचा शहर म्हणून डाेंबिवलीची ओळख आहे. पण सध्या अनेक कारणांनी डोंबिवली चांगलंच चर्चेत आहे. रस्त्यावरील खड्डे असो, वीजेचा प्रश्न असो वा नागरी सुविधांची बाेंबाबोंब डोंबिवलीकर मेटाकुटीला आला आहे. जोराचा पाऊस झाला कि आता डोंबिवली भरूही लागली आहे. डोंबिवली पूर्वेतील नांदिवली परिसरातील नागरिक कित्येक वर्षे या समस्याचा सामना करीत आहे. प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणताच तोडगा काढला जात नसल्याने अखेर नांदिवलीकर रहिवाशांना ठियया आंदेालन करण्याची वेळ आलीय. गुरूवारी शेकडेा नागरिक रस्त्यावर उतरले. यावेळी नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
महापुराने सर्वांचीच दाणादाण उडववून दिली खरी पण डोंबिवली पूर्वेतील नांदीवली भागात महापूर असो वा नसो दरवर्षी पावसाळयात नागरिकांची नेहमीच दाणादाण उडते. स्वामी समर्थ मठ परिसरातील रस्त्यावर तर गुडघाभर पाणी साचलेले होते. परिणामी इथला वीज पुरवठाही खंडीत झाल्याने याठिकाणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. गेल्या काही वर्षांपासून या परिसरात पाणी साचत आहे. या समस्येवर तोडगा काढावा यासाठी इथल्या सर्व सोसायटयातील रहिवाशी पालिका प्रशासनाकडे अनेक वर्षापासून पाठपुरावा करीत आहे पण पालिका प्रशासनाकडून कोणतीच दाद दिली नसल्याने नागरिकांच्या सहनशिलतेचा अंत झाला आहे. रस्त्यांची अवस्थाही खूपच खराब झाली आहे. त्यामुळे रहिवाशांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन केले यावेळी स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला नागरिकांच्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठींबा दर्शविला. येत्या १५ दिवसांत ही समस्या न सुटल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी यावेळी दिला.
आम्ही टॅक्स भरणार नाही
कित्येक वर्षे आम्ही टॅक्स भरतो, मग आमच्या टॅक्सचा पैसा जातो कुठे ? इथल्या रहिवाशाना पाण्यातून जावं लागतं, इथल्या सोसायटयांकडून पालिकेकडे लाखो रूपये टॅक्स भरला जातो मात्र त्या प्रमाणात कोणत्याचा सोयी सुविधा पुरविल्या जात नाहीत साचलेल्या पाण्यातून वृद्धांना हॉस्पिटल मध्ये घेउन जाऊ शकतं नाही. मग आम्ही टॅक्स का दयावा त्यामुळे यापुढे आम्ही टॅक्स न भरण्याचा निर्णय घेतला असून सगळं टॅक्स कोर्टात जमा करणार आहे अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक महिलेने व्यक्त केली