प्रसिद्ध कलादिग्दर्शक संजय धबडेंची संकल्पना

डोंबिवली : अमृतमहोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या आणि डोंबिवलीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नावाजलेल्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात यावर्षी काश्मिरच्या दल सरोवरातील हाऊस बोटीत विराजमान बाप्पाचा देखावा साकारला आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक संजय शशिकांत धबडे यांच्या संकल्पनेतून साकारली जाणारी मंडळातील यावर्षीची रौप्यमहोत्सवी सजावट आहे.

कलादिग्दर्शक संजय धबडे यांच्या संकल्पनेतून त्यांचा सहकलाकारांसह काश्मिरच्या दल सरोवरातील हाऊसबोटीत विराजमान गणेशाची सजावट संकल्पना घेऊन एक आकर्षक सजावट साकारली आहे. काश्मिरी कोरीवकाम केलेली हाऊस बोट तसेच दोन शिकारे आणि सभोवताली केलेला दल सरोवराचा आभास आणि मंद काश्मिरी संगीत यामुळे गणेश भक्तांना काश्मिरच्या दल सरोवरात आल्याचा भास होत आहे . तसेच तेथील दोन्ही शिकाऱ्यांमध्ये बसून फोटो काढण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत.

मंडळात केलेल्या रौप्यमहोत्सवी सजावटींबद्दल बोलताना कलादिग्दर्शक संजय धबडे म्हणाले की माझे बालपण आणि उमेदीचा काळ ज्या टिळकनगरात गेला त्या नगरातील सजावट सलग २५ वर्ष करायला मिळाल्याचा आनंद आहे. डोंबिवलीकर खूप रसिक आहेत आणि दरवर्षी माझी सजावट संकल्पना बघून माझे मित्र, नगरवासिय आणि डोंबिवलीकर मला फोन करून सजावटीबद्दल अभिप्राय देतात त्यामुळे मला मी केलेल्या कामाचा आनंद मिळतो आणि समाधानही वाटते. पुढील अनेक वर्षे बाप्पाची इच्छा असेल तर टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सजावट करण्याची माझी इच्छा आहे असेही संजय धबडे म्हणाले.

तसेच पुढच्या अमृतमहोत्सवी वर्षात मंडळाच्या सजावटीत एक भव्यदिव्य कलाकृती साकारण्याचा मानसही धबडे यांनी बोलून दाखवला. मंडळाचे कार्यवाह बल्लाळ केतकर यांनी उत्सव सत्रात २७ सप्टेंबरपर्यंत आयोजित सैनिकांची विजय गाथा सांगणाऱ्या प्रदर्शनास भेट देण्याचे व दल सरोवराच्या सजावटीच्या साथीने करावयाच्या कलाधिश या रिल्स स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आणि रोख बक्षिस जिंकण्यासाठी आवाहन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!