ठाणे मनपाची एमएमआरडीए ला विकास आराखडा तयार करण्याची सूचना

डोंबिवली :   मुंब्रा -दिवा-कोपर डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून कागदावरच राहिला होता. माजी आमदार हरिश्चंद्र पाटील यांच्या मृत्यूनंतर मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. यावर नुकतीच ठाणे मनपा आयुक्तांची बैठक पार पडली असून ठाणे मनपाने एमएमआरडीए ला विकास आराखडा तयार करण्याची सूचना केली आहे. तसेच आमदार राजू पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हिवाळी अधिवेशनात भेट घेतली. या रस्त्यासाठी तातडीने पाऊले उचलून काम मार्गी लावू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले . त्यामुळे आता रेल्वे समांतर रस्त्याच्या कामाला गती येणार असल्याचे दिसून येत आहे.  

कल्याण शिळ रस्त्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. मात्र वाढत्या कल्याण शिळ रस्त्यावरील नागरी वस्तीचा आणि वाहनांचा विचार करता डोंबिवली मुंब्रा-दिवा-कोपर-डोंबिवली ( रेतीबंदर ते दिवा गावापर्यंत ) समांतर खाडीच्या बाजूने मंजूर असलेल्या रस्त्याचे काम करणे गरजेचे झाले आहे. २००७ मध्ये सर्वेक्षण झालेला हा रस्ता ठाणे मनपाच्या विकास आराखड्यात देखील समाविष्ट आहे. मात्र या रस्त्यासाठी पाठपुरावा न झाल्याने तो कागदावरच राहिला असल्याने त्याचे काम हे प्रत्यक्ष करणे गरजेचे आहे. या रस्त्यामुळे कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या शहरातील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी पाठपुरावा सुरु केला होता. त्यानंतर आता ठाणे मनपाने देखील एमएमआरडीएला विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत.

रेल्वे समांतर रस्ता हा ४८५० मी. लांबीचा असून ३० मी. रुंदीचा आहे. तर पुलाच्या स्वरूपातील रास्ता हा १७.५० मी. आहे. या समांतर रस्त्यासाठी अंदाजे ६५१.७४ कोटी रुपयांचा खर्च वर्तवण्यात आला आहे. एमआरडीएने या प्रकल्पास मंजुरी आणि सहमती दाखवल्यास प्रकल्पाच्या कामाला आता गती येणार आहे. मात्र सद्या परिस्थितीत या प्रकल्पाला गती देण्यासाठी महापालिकेची आर्थिक स्थिती मजबूत नसल्याचे कारण महापालिकेने पुढे केले आहे.त्यामुळे एमएमआरडीए कडे ठाणे मनपाने आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी आणि मंजुरी मिळण्यासाठी एमएमआरडीएला प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे आता एमएमआरडीए या प्रस्तावाला काय उत्तर देते हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.   

आमदार राजू पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

रेल्वे समांतर रस्त्यासाठी तत्कालीन डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार कै. हरिश्चंद्र पाटील यांनी डोंबिवली मुंब्रा समांतर रस्ता तयार करण्याची मागणी केली होती. त्यावेळी तत्कालीन आमदार आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील समर्थन दर्शवले होते. मात्र पाठपुरावा झाला नसल्याने रस्ता कागदावरच राहिला होता. यानंतर मनसे आमदार प्रमोद(राजू)पाटील यांनी पाठपुरावा सुरु केला होता. सतत ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विषय हाती घेत रस्त्यासाठी आग्रही मागणी करत होते. या नंतर सध्या सुरु असलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशन काळखंडात महाराष्ट्राचे ठाणे जिल्ह्यातील पहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांची देखील या रस्त्यासाठी तातडीने पाऊले उचलून काम मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता रेल्वे समांतर रस्त्याच्या कामाला गती येणार असल्याचे दिसून येत आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!