ठाणे : नागरिकांनी सदनिका खरेदीचा व्यवहार करताना विकासकाने ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाकडून आवश्यक त्या परवानग्या घेतल्याची खातरजमा करूनच सदनिका खरेदी कराव्यात, शहरातील अनधिकृत इमारतीमध्ये सदनिका व्यवहार न करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान अनधिकृत इमारतीमध्ये सदनिका खरेदी केल्यास व अशा बांधकामांवर ठाणे महानगरपालिकेने कारवाई केल्यास त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीस ठाणे महानगरपालिका जबाबदार राहणार नाही याची नागरीकांनी नोंद घ्यावी असेही पालिकेने कळविले आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील काही विकासक नियमबाह्य अथवा आवश्यक त्या परवानग्या प्राप्त न करुन घेता, बांधकाम करीत असतात. अशा अनधिकृत इमारतीमध्ये नागरिक सदनिका खरेदी करण्याचे व्यवहार करतात. परंतु ठाणे महानगरपालिकेच्या निदर्शनास आल्यानंतर अशा बांधकामांवर ठाणे महानगरपालिकेकडून निष्कासनाची कारवाई केली जाते. त्यामध्ये सामान्य नागरीक जे अशा अनधिकृत बांधकामामध्ये सदनिका खरेदी करतात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होवून त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे नागरिकांनी अनधिकृत इमारतीमध्ये सदनिका खरेदी करु नयेत. सदनिका खरेदीचा व्यवहार करताना विकासकाने ठाणे महानगरपालिकेकडून आवश्यक त्या परवानग्या घेतल्या आहेत याबाबत ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाशी संपर्क साधून खातरजमा करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *