ठाणे, दि. ४ : मराठी विश्वात अढळ स्थान मिळविलेल्या पंचरत्नांकडून अजरामर झालेल्या गीतांच्या स्वराने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते, भाजपा व विश्वास सामाजिक संस्था यांनी सादर केलेल्या दिवाळी संध्या कार्यक्रमाचे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, प्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके, कविवर्य वसंत बापट, प्रसिद्ध गायक डॉ. वसंतराव देशपांडे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्ताने विश्वास सामाजिक संस्थेने उमा नीळकंठ व्यायामशाळेच्या मैदानावर बुधवारी `दिवाळी संध्या’ कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला ठाण्यातील दर्दी रसिकांची पसंती मिळाली.
प्रसिद्ध गायिका माधुरी करमरकर, अनुजा वर्तक, विद्या शिवलिंग, धनंजय म्हसकर, निलेश निरगुडकर यांनी गीते सादर केली. राजस सुकुमार ‘ या अभंगापासून, प्रथम तुला वंदितो, तोच चंद्रमा नभात आदी गीतांबरोबरच खट्याळ गीत काय बाई सांगू’, प्रेमगीत येशील येशील’ पासून कट्यार काळजात घुसली’च्या प्रसिद्ध गीतांनी मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. मराठी चित्रपट विश्वातील तब्बल ६० ते ७० वर्षांच्या इतिहासातील सुमधुर संगीताची झलकच रसिकांना अनुभवायला मिळाली. पंचरत्नांचा इतिहास, त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये आणि किस्से सांगत मयुरेश साने यांनी निवेदन केले.
विश्वास सामाजिक संस्थेचे कार्य उल्लेखनीय : आशिष शेलार
ठाण्यातील सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक वर्तुळात विश्वास सामाजिक संस्थेकडून केले जाणारे कार्य उल्लेखनीय आहे. कोरोना आपत्तीतून दिलासा मिळत असताना, यंदाची दिवाळी ही नागरीकांचे मन प्रफुल्लित करणारी ठरेल, अशा शब्दांत भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी उद्घाटनावेळी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, गटनेते मनोहर डुंबरे, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, संदिप लेले, प्रतिभा मढवी, राजेश मढवी, रमेश आंब्रे, कु. वृषाली वाघुले यांची उपस्थिती होती.