दिवाळी पहाट अन् तरूणाईचा जल्लोष
डोंबिवली( आकाश गायकवाड) :- दरवर्षीप्रमाणे यंदाही डोंबिवली दिवाळी पहाटला तरुणाईचा उत्साह आणि जल्लोष दिसून आला. सकाळी अभ्यंगस्नान करून पारंपरिक वेशभूषेत डोंबिवलीकर तरुणाई फडके रोडवर अवतरली. पुणेरी ढोल, झांजपथकांचा गजर आणि सेल्फीच्या शोधात आणि रमणाऱ्या घोळक्यांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. दिवाळी पहाटेची सुरमयी गाणी, नृत्यांचे सादरीकरण आणि रस्त्यांवरील नयनरम्य रांगोळ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होते . गणेश मंदिरात गणेशाचे दर्शन घेण्यासाठी होणारी लगबग आणि नंतर सेलिब्रेटीच्या ऑटोग्राफसाठी झुंबड उडाली होती.
गणेश मंदिर संस्थान माध्यमातून आप्पा दातार चौकात नृत्याविष्कार सादर करण्यात आला. गायक अभिजित कोसंबी, महेश कोठारे आणि त्यांचे चिरंजीव यांची उपस्थिती महत्वाची होती. वक्रतुंड ढोल पथकाने विविध प्रकारे ढोल वादन करून पाहुण्यांचे लक्ष वेधले. स्टार प्रवाह वाहिनीच्या कलाकारांनी “ये ई ओ विठ्ठले” मालिकेचे प्रमोशन केले. तसेच स्थानिक शिवगौरी नृत्यालाय संस्थेच्या कलाकारांनी “महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचा नृत्याविष्कार सादर केला. यावेळी गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले, प्रवीण दुधे, पदाधिकारी उपस्थित होते. तर शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना युवा जिल्हा अधिकारी दिपेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून संगीत, नृत्य कार्यक्रम बाजीप्रभू चौक येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाचाही डोंबिवलीकरांनी आस्वाद घेतला. शहरात विविध ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमात डोंबिबलीकर सहभागी झाले होते.
दिवाळी पहाट कार्यक्रमात अंध व्यक्तींचा सत्कार
डोंबिवली :- युवक काँग्रेस डोंबिवली विधानसभा सचिव तथा शिक्षण मंडळ समितीचे माजी उपसभापती अमित म्हात्रे यांच्या वतीने डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट चौक येथे आयोजित केलेल्या दिवाळी पाहत कार्यक्रमात उपस्थित मान्यवराच्या हस्ते अंध व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या या कार्यक्रमाचे नागरिंकानी कौतुक करत यावेळी सेल्फी पॉईट येथे तरुणवर्गानेगर्दी केली होती. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्या तथा माजी नगरसेविका रत्नप्रभा भास्कर म्हात्रे ,काँग्रेस गटनेते नंदू म्हात्रे , माजी नगरसेवक हृदयनाथ भोईर , काँग्रेस पदाधिकारी सत्यवान म्हात्रे , वर्षा शिखरे , वर्षा गुजर , डॉ. अकोले आदी मान्यवर उपस्थित होते. जयहिंद अंध कल्याणकारी संस्थेच्या सदस्य असलेल्या अंध व्यक्तींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना पांढरी काठी देण्यात आली. तर यावेळी काही कर्णबधिर व्यक्तींचाहि सत्कार झाला. ईगल ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ बिवलकर , अशोक हेगिष्टे आधीचाही सत्कार करण्यात आला. यावेळी यावेळी आयोजित केलेला ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. डोंबिवली पश्चिमकडे दिवाळी पहाट कार्यक्रम ठेवल्याने नागरिकांनी अमित म्हात्रे यांचे आभार मानले.
अशी रंगली दिवाळी पहाट …