मधलीवाडी व भल्याच्या वाडीत बसविल्या कुपनलिका


ठाणे, अविनाश उबाळे : नेहमीच समाजसेवी उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेणारे शहापूर तालुक्यातील धसई वनक्षेत्रपाल दर्शन ठाकूर यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून टाकीपठार सारख्या अति दुर्गम आदिवासी बहुल भाग असणाऱ्या मधलीवाडी व भल्याचीवाडी येथे नवी मुंबई येथील सिडको बी.सी.एम्प्लॉईज असोसिएशन यांच्या अर्थसहाय्याने दोन्ही वाड्यांमध्ये कुपनलिका बसवल्याने येथील आदिवासी बांधवांची उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर आदिवासींची पाणीटंचाई दूर झाल्याने या अनोख्या दिवाळी भेटीने आदिवासी बांधव आणि भगिनींच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद दिसून येत आहे.


गेल्या काही वर्षापासून सिडकोमध्ये या असोसिएशनकडून नवी मुंबई सिडको येथे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येते.त्यामधून जमा होणाऱ्या निधीमधून सदरची एम्प्लॉईज असोसिएशन आदिवासी खेड्यापाड्यांमध्ये जल प्रकल्प राबवत असते.यावर्षी तेथील सदस्य दिलीप वैद्य व यतीन तांडेल यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ दिलेल्या अर्थसहाय्याने सदरचा जल प्रकल्प राबविल्याचे असोशियनचे जनरल सेक्रेटरी नितीन कांबळे यांनी सांगितले.याप्रसंगी वनअधिकारी दर्शन ठाकूर आणि सिडको बीसी एम्प्लॉईज असोसिएशनचे पदाधिकारी यांचे आदिवासी बांधवांनी आणि भगिनींनी मनःपूर्वक आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *