दिवा:- दिवा आगासन हा रहदारीचा असलेला रस्ता अर्धवट अवस्थेत रखडून राहिल्याने नागरिकांना वाहनचालकांना प्रचंड त्रास आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे दिवावासियांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत हा रस्ता पूर्ण न झाल्यास १० डिसेंबरला उपोषणला बसण्याचा इशारा सेव्ह दिवा फाउंडेशनचे अध्यक्ष भाजपचे रोहिदास मुंडे यांनी दिलाय.
दिवा शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन हा मुख्य रस्ता तातडीने होणे गरजेचे असताना या रस्त्याच्या कामात दिरंगाई होत आहे.अनेक ठिकाणी काम अर्धवट असून याचा फटका सामान्य नागरिक व वाहन चालकांना होत आहे.मागील पाच वर्षापासून या रस्त्याचे काम रखडलेले आहेत त्यामुळे ठाणे महापालिका व सत्ताधाऱ्यांच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
दिवा आगासन रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले बसल्याने वाहने आणि पादचारी यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे .नागरिकांना रस्त्यावरून चालणेही मुश्किल होऊन जाते. वृध्द, महिला बालकांना खूपच तारेवरची कसरत करावी लागत आहे. सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी हे काम रखडल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे त्यामुळे अर्धवट रखडलेल्या रस्त्यातून आणि वाहतूक कोंडीततून दिवावासियांची कधी सुटका होणार ? असा प्रश्न उपस्थित हेात आहे.