डोंबिवली : जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त रविवारी सावरकर गार्डन डोंबिवली पूर्व येथे १०० अंध बांधवांना काठीचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटी, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली उपटाऊन, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स, जीवन आधार सामाजिक संस्था व व्हिजन इन्साईट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सावरकर गार्डन, डोंबिवली पूर्व येथे काठी वाटप कार्यक्रम संपन्न झाला. जीवन आधारचे अध्यक्ष उमेश चव्हाण, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटी चे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स चे अध्यक्ष विद्याधर कुलकर्णी, उपटाऊनचे सेक्रेटरी गोरुले व व्हिजन फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत पाटील ह्यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम पार पडला.
उमेश चव्हाण यांनी पांढऱ्या काठीच्या इतिहासाची व १५ ऑक्टोंबर ह्या जागतिक पांढरी काठी दिनाची माहिती दिली, ह्या दिनानिमित्त जनजागृती झाली पाहिजे असे त्यांनी नमूद केले. अंध व्यक्तीच्या कल्याण कार्यामध्ये योगदान देणाऱ्या मिस. तानिया बलसारा व हर्षद जाधव यांना ‘श्रीमती अलका हेमंत पाटील व्हीआयएफ एक्सलन्स अवॉर्ड २०२३’ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला अंधबांधवांची जनजागृती करीता रॅली काढण्यात आली. रॅलीचा प्रारंभ फडके रोड वरून करण्यात आला व त्यांची सांगता सावरकर उद्यानात झाली. रॅली प्रसंगी जनजागृति साठी विविध घोषणा देण्यात आल्या. जीवन आधार व रोटरी तर्फे हा कार्यक्रम मागील १० वर्षापासून आयोजित करण्यात येत आहे. अशी माहिती जीवन आधारचे सेक्रेटरी राहुल कराडकर यांनी दिली.