मुंबई :  कोरोना काळात एक वा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आला असून, मार्च २०२३ पर्यंतच्या लाभाची रक्कम या सर्व मुलांना देण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. तसेच मुलांचा शैक्षणिक खर्च बाल न्याय निधीतून करण्यात येत असल्याचेही अदिती तटकरे यांनी सांगितले.

राज्यात कोरोना कालावधीत अनाथ झालेल्या मुलांसाठी बाल न्याय निधीच्या वाटपासंदर्भात सदस्य रमेश कराड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना तटकरे यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बाल न्याय निधीमध्ये २५ कोटी ५३ लाख, २५ हजार ५४८ कोटी रुपये बाल न्याय निधीमध्ये जमा करण्यात  आले आहेत. त्या रकमेतून कोविड काळात पालक गमावलेल्या बालकांच्या शाळांची फी, वसतिगृह शुल्क, शैक्षणिक साहित्य इत्यादी शैक्षणिक खर्च भागविला जातो. अजूनपर्यंत या निधीतून १४ कोटी ६८ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले.  मात्र कोविडमध्ये पालक गमावलेल्या सरसकट मुलांना ही रक्कम वितरीत करण्यात येत नसून न्यायालयाने दिलेल्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या मुलांनाच रु. १० हजार आर्थिक साह्य द्यावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. 

बालसंगोपन योजनेंतर्गत मार्च २०२३ पर्यंत बालकांच्या बॅंक खात्यावर  रु. ११०० प्रमाणे लाभ जमा करण्यात आला आहे. तसेच एप्रिल २०२३ पासून २२५० रुपयांप्रमाणे बालसंगोपन लाभासाठी ५४.८४ कोटी निधी देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली. 

ऑक्टोबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीतील अनुदान ६२,०५० बालकांच्या बॅंक खात्यात  जमा करण्यात आले असून, दोन्ही पालक गमावलेल्या  ८६९ बालकांच्या  नावे प्रत्येकी ५ लाख रुपयांप्रमाणे रक्कम जमा करण्यात आली असून २२ मुलांची बॅंकखाती उघडण्याची प्रक्रिया जिल्हा स्तरावर सुरू असल्याचे तटकरे यांनी सांगितले. यामध्ये पुणे-२, सोलापूर-१, सातारा-८. सांगली-२, यवतमाळ-४, हिंगोली-२, जालना-१, चंद्रपूर-१ अशा बावीस अनाथ मुलांचा समावेश आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!