मुंबई : येत्‍या 15 ऑगस्‍टपासून उपनगरीय रेल्‍वे प्रवास करण्‍यास मुभा देण्‍याची घोषणा राज्‍याचे मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यानुसार आज सकाळी ७ वाजल्‍यापासून मुंबई महानगरपालि‍का क्षेत्रातील ५३ रेल्‍वे स्‍थानकांवर ३५८ मदत कक्ष सुरु करण्‍यात आले आहेत.आज दुपारी ३ वाजेपर्यंतच्या पहिल्या सत्रात या सर्व ५३ स्थानकांवर मिळून एकूण १८ हजार ३२४ रेल्वे प्रवाशांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. दुपारपर्यंत पहिल्या सत्रात १७ हजार ७५८ मासिक पास देण्यात आले आहेत. यामध्ये मध्य रेल्वेद्वारे १२ हजार ७७१, तर पश्चिम रेल्वेद्वारे देण्यात आलेल्या ४ हजार ९८७ मासिक पासांचा समावेश आहे.


ज्‍या नागरि‍कांना कोविड लशीचे दोन डोस घेतल्‍यानंतर १४ दिवस पूर्ण झाले आहेत, त्‍यांचे लसीकरण अंतिम प्रमाणपत्र आणि छायाचित्र असणारं ओळखपत्र पडताळण्यात येत आहे. या ऑफलाईन पडताळणीमध्‍ये पात्र ठरलेल्‍यांना रेल्वेकडून मासिक पास दिला जात असून त्याआधारे उपनगरीय रेल्‍वे प्रवासाची मुभा देण्‍यात आली आहे.दररोज सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सलग २ सत्रामध्‍ये मदत कक्ष कार्यरत असणार आहेत. यामुळे विनाकारण गर्दी न करता नागरिकांनी आपल्‍या घराजवळील रेल्‍वे स्‍थानकांवर पडताळणीकरिता जावे, असे आवाहन पुनःश्च महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *