मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राजकारणापासून दोन महिन्यांचा ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले आहे. दोन महिने मुलासोबत घालवणार आहे. मात्र याकाळात सामाजिक काम सुरुच राहाणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचे वृत्त सपशेल खोटे आहे. माझ्या बद्दलच्या प्रश्नांना मी किती काळ उत्तर द्यायचे, असेही व्यथित पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. मी २० वर्षांपासून भाजपमध्ये काम करत आहे. भाजप सोडून मी कुठेही जाणार नाही. मात्र माझे करियर संपवण्याचा डाव कोणाचा आहे, असा संतप्त सवाल पंकजा मुंडे यांनी केला.

पंकजा मुंडे या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. सांगलीच्या एका बड्या नेत्यांच्या मध्यस्थीने त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याचे वृत्त एका खासगी मराठी वृत्तवाहिनीने दिले होते. त्यामुळे पंकजा मुंडे संतप्त झाल्या आहेत. शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या भेटीच्या वृत्ताचे खंडन केले. त्यासोबतच संबंधित वृत्तवाहिनीवर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचेही सांगितले. माझे राजकीय आयुष्य कवडीमोल नाही. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचे खोटे वृत्त देणाऱ्या वृत्तवाहिनीविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार आहे. पाठीत खंजीर खुपसण्याचे संस्कार माझ्या रक्तात नाही असेही मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे विधानसभा निवडणुकीत (2019) परळीतून पराभूत झाल्यासून वारंवार त्यांच्या नाराजीच्या बातम्या येत आहेत. त्यासोबतच अनेक पक्षांकडून त्यांना ऑफर असल्याच्याही बातम्या असतात. त्याबाबत बोलताना पंकजा म्हणाल्या की, इतर पक्षाच्या नेत्यांकडून मला मिळणाऱ्या ऑफरवर काही बोलण्याची मला गरज वाटत नाही. ते माझ्यावर विश्वास व्यक्त करतात हा त्यांचा मोठेपणा आहे. मात्र राहुल गांधी यांची भेट घेतल्याचे वृत्त म्हणजे एखाद्याचे राजकीय आयुष्य संपवण्याचा हा डाव आहे, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.

माझे राजकीय आयुष्य कवडीमोल नाही. 20 वर्षांपासून राजकारणात काम करते. माझ्या स्पष्टवक्तेपणामुळे, प्रामाणिकपणामुळे मी थेट लोकांमध्ये जाऊन काम करते, त्यांच्याशी संवाद साधते, याच्यामुळे माझे नेतृत्व आहे. ‘माझ्यावर माझ्या वडिलांचे- गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार झालेले आहेत. त्यामुळे पाठीत खंजीर खुपसण्याचे रक्त माझ्या अंगात नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. माझ्याबाबतच या चर्चा का होतात. प्रत्येक वेळी पंकजा मुंडे यांचे नाव येते, मात्र पंकजा मुंडे तिथे येत नाही, त्या पदावर दिसत नाही. त्यामुळे या चर्चा होतात. हा दोष माझा नाही. याच्यावर उत्तर पक्षाने द्यायला पाहिजे. पंकजा मुंडे पात्र आहेत की नाही, यावर पक्षाने उत्तर द्यायला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधान परिषदेच्या अनेकदा निवडणुका झाल्या. अनेकदा माझे नाव चालले, पण ते आलं नाही. त्यावर मी कुठेही टिप्पणी केली नाही. कुठलेही ट्विट केले नाही. सार्वजनिकरित्या त्यावर कुठेही नाराजी व्यक्त केली नाही. पण माझ्या भाषणाचे तुकडे काढून त्याचे अर्थ काढले जातात. याचे उत्तर पंकजा मुंडेकडे असण्याचे कारण नाही, असं त्या म्हणाल्या.

नैतिकतेवर प्रश्न का?

मागील दोन्ही विधान परिषदांवेळी मला फॉर्म भरुन ठेवायला सांगितले. सकाळी ९ वाजता फॉर्म भरण्यासाठी येण्याचेही पक्षाकडून सांगितले गेले. त्याच्या 10 मिनिटे फॉर्म भरायचा नाही, असे सांगितले जाते. जैसी आप की आज्ञा, असे समजून मी पक्षाचा प्रत्येक आदेश शिरसावंद्य मानला. मी पक्षाच्या विरोधात काहीही केले ऩसताना माझ्या नैतिकतेवर का प्रश्न निर्माण केला जातोय, असा भावनिक प्रश्न पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला.

मी राजकारण करेन, नाही करणार, कोणासोबत करेल हा वेगळा प्रश्न आहे. मात्र मी राजकारण करत असताना नेहमीच स्पष्ट भूमिका घेतली आहे. मला काही करायचे असेल तर मी ‘डंके की चोट पे’ करेन. गुप्तपणे, अंधारात जाऊन काहीही करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या मनात नक्की काय ते जाणून घेऊ : फडणवीस

पंकजा मुंडेंच्या भूमिकेविषयी प्रसार माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, आमच्या पक्षातील काहींचा संघर्ष कायमच राष्ट्रवादीविरोधात राहिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आमच्यासोबत आल्यानंतर काही जणांची नाराजी स्वाभाविक आहे. मात्र, यावर आम्ही संबंधित नेत्यांशी चर्चा करणार आहोत. पंकजा मुंडे या आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करू. त्यांच्या मनात नेमके काय आहे, ते जाणून घेऊ. त्यासाठी आमचे वरिष्ठ नेते पंकजा मुंडे यांच्यासोबत चर्चा करतील. त्या पक्षात सातत्याने काम करत राहतील. त्या भाजपमध्येच आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!