मुंबई : ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्ती अजय आशर यांची मित्र च्या नियामक मंडळ उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी नगरविकास विभागाचे निर्णय घेणारी आशर नावाची व्यक्ती कोण, असा प्रश्न विचारला होता. त्यामुळे काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही शेलार यांचा जुना व्हिडीओ शेअर करीत चपराक लगावली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह भाजपही विरोधकांच्या निशाण्यावर आली आहे.
केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ अर्थात ‘मित्र’ चा नियामक मंडळ स्थापन करण्यात आले आहे. राज्यातील कृषी संलग्न क्षेत्र, आरोग्य आणि पोषण, लघुउद्योग, उद्योग अशा १० महत्त्वाच्या क्षेत्रांत दिशादर्शनासाठी हे मंडळ काम करत. ‘मित्र’च्या नियामक मंडळात एकूण १४ जणांचा समावेश असेल. या मंडळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सरकारने नामनिर्देशित केलेल्या दोघांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाईल. मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त विभाग), अतिरिक्त मुख्य सचिव (नियोजन विभाग) यांच्यासह सहा तज्ज्ञ व्यक्तींची निवड केली जाणार आहे. कार्यकारी मंडळात एकूण १२ जणांचा समावेश असणार आहे.
काँग्रेसकडून आक्षेप …
‘मित्र’चे उपाध्यक्ष म्हणून अजय आशर आणि माजी आमदार तसेच राज्य नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर या दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन आदेश नियोजन विभागाने शुक्रवारी जारी करण्यात आला आहे. मात्र आशर यांच्या नियुक्तीवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने चुकीचा पायंडा पाडला आहे. त्यांच्यासारख्या लुटारु व्यक्तीला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर शिंदे यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
विरोधी पक्षनेत्यांकडून आशिष शेलार यांचा व्हिडीओ ट्विट ….
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी ट्विट करीत एका व्हिडीओची आठवण करून दिली आहे. विरोधी पक्षात असताना भाजपने आशर यांच्या मंत्रालयातील विशेषतः नगरविकास खात्यातील सततच्या वावराबद्दल प्रश्न उपस्थित केला होता.