दीक्षाभूमी विकास आराखडा लवकरच कार्यन्वित : मुख्यमंत्री
६१ वा धम्म चक्र प्रवर्तनदिन उत्साहात साजरा
नागपूर : दीक्षाभूमी नेहमी ऊर्जा देत असून याठिकाणी बाबासाहेबांनी बौद्धधम्माची दीक्षा घेतली. बाबासाहेब हे विज्ञानवादी होते. जे समाजासाठी उत्तम आहे, तेच त्यांनी स्वीकारले. दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा शासनाने तयार केला असून तो लवकरच कार्यान्वित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दीक्षाभूमी येथे आयोजित ६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते.
दीक्षाभूमी येथे आज ६१ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, देशाच्या प्रगतीचा पाया रचण्याचे काम बाबासाहेबांनी केले. बाबासाहेब हे व्यक्ती नाही तर संस्था होते. बाबासाहेब राष्ट्रनिर्माते युगपुरुष असून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच सर्वांना समान संधी प्राप्त झाली आहे.
शस्त्रांशिवाय जगाला जिंकणारा एकमेव बौद्ध धर्म असून जगात सर्वात प्रगत राष्ट्र असलेला जपान बौद्ध धर्माच्या विचारावर जातो. आपल्या जीवनावर भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचा प्रभाव असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. बौद्धस्थळांची शंभर कोटींची पर्यटन विकास योजना तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. वंचितांचा विकास हेच सरकारचे ध्येय असून आपले सरकार बाबासाहेबांच्या विचारावरच मार्गक्रमण करेल असे ते म्हणाले.
समता, समानता व न्याय हे बाबासाहेबांचे तत्व असून या तत्वानुसारच देशाची प्रगती होईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. केंद्र सरकारने नदी जोड प्रकल्प ही महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. नदी जोड प्रकल्पाची प्रेरणा बाबासाहेबांकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ज्या गोष्टी आज आम्ही करत आहोत, जी प्रगती आज होत आहे त्या सर्व बाबी बाबासाहेबांनी त्याकाळी नमूद केल्या होत्या, असे ते म्हणाले. बाबासाहेबांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांचे विचार मनामनात रुजविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. बाबासाहेब यांचे ‘व्हिजन’ प्रेरणादायी होते. आणि त्यानुसारच देश प्रगती करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताला मजबूत करण्याचा विचार बाबासाहेबांनी दिला, असे मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. पाली भाषेचा समावेश भारतीय भाषेत व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी सांगितले.दीक्षाभूमीवरील या कार्यक्रमास बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.