ठाणे : इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित ‘डिजी ठाणे’ या भारतातील पहिल्या डिजीटल प्लॅटफॉर्म प्रणालीला ‘स्कॉच’ सुवर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्मार्ट सिटी लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे हा पुरस्कार स्वीकारला. दरम्यान डिजी ठाणेसह इंटिग्रेटेड कमांड ॲन्ड कंट्रोल सेंटर आणि इंटलिजन्स ट्रान्सपोर्ट सिस्टम या प्रकल्पांना स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्कॉचच्या 76 व्या परिषदेमध्ये हे पुरस्कार वितरित करण्यात आले.
स्मार्ट सिटीज मिशन मर्यादित (टीएससीएल) ने दृष्टीने उत्कृष्ट कामगिरी केली असून सरकार, स्थानिक व्यवसाय यांच्यात वाढलेली डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि सहकार्य साध्य केले आहे . नागरिकांद्वारे सरकार ते नागरिक (जी 2 सी), व्यवसाय ते नागरिक (बी 2 सी) आणि नागरिक ते नागरिक (सी 2 सी) सेवा देण्यात डीजी ठाणेचे योगदान महत्वपूर्ण आहे. ‘स्कॉच’ या संस्थेकडून दरवर्षी पर्यावरण ,स्मार्ट सिटी व इतर विविध क्षेत्रात उल्लेंखनीय काम करणाऱ्या संस्थांचे मूल्यमापन करून त्यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव केला जातो. त्याचबरोबर यशस्वी आपत्ती व्यवस्थापन, गुन्हेगारीच्या घटना कमी करण्यासाठी आणि कोव्हीड काळात कोव्हीड वॉर रुम करीता महत्वाची कामगिरी बजावण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या इंटिग्रेटेड कमांड ॲन्ड कंट्रोल सेंटर या उपक्रमास ‘स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर टीएमटी प्रवाशांना उपयुक्त ठरणा-या इंटिलिजन्स ट्रान्सपोर्ट सिस्टीम या उपक्रमासही ‘स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
…………………………………………….