त्या सैनिकाच्या कुटुंबियांच्या शोधासाठी, केंद्र सरकारकडून स्वतंत्र अधिकारी नेमणार : हंसराज अहिर

 धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : भारतीय सैन्यातील नायक अनिल गौंडगे यांच्या पत्नी व मुलीच्या शोधासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत या मागणीसाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सेामवारी त्या सैनिकासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्या सैनिकाच्या कुटुंबियांच्या शोधासाठी महाराष्ट्र सरकार पुर्णपणे प्रयत्न करेल असे आश्वासन देत मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री.हंसराज अहिर यांच्याशी दुरध्वनीद्वारे चर्चा केली. त्यावेळी अहिर यांनी या सैनिकाच्या कुटुंबियांच्या शोधासाठी केंद्र सरकारकडून स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात येईल असे  सांगितले.

परभणी येथील सेलू येथील रहिवाशी असणारे अनिल गौंडगे हे सैनिक अरूणाचल प्रदेशात कर्तव्यावर असताना त्यांची पत्नी व मुलगी दोन महिन्यांपासून बेपत्ता झालीय. या प्रकरणी अरूणाचल प्रदेशात पोलीस तक्रार नोंदवुनही अद्याप तपास लागत नसल्याने गौंडगे कुटुंबिय हवालदिल झालेत. देशासाठी प्राणपणाने काम करणार्‍या सैनिकांच्या कुटुंबियांचा शोध लागत नसल्याने राज्यात आणि सोशल मिडीयावरूनही संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. या बाबत अनिल गौंडगे यांनी मुंडे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी अनिल गौंडगेसह मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. गौंडगे यांच्या कुटुंबियांचा तातडीने शोध लावावा यासाठी महाराष्ट्र सरकारनेही प्रयत्न करावेत अशी मागणी मुंडे यांनी केली. यावेळी मुंडे यांच्या समवेत परभणीचे आमदार विजय भांबळे .विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्राताई वाघ उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *