नागपूर : ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ हा भारतात साजरा केला जाणारा महत्वाचा उत्सव आहे. या दिवशी महाराष्ट्रासह देशभरातील लाखो अनुयायी नागपूरला येतात. या दिवसाची पार्श्वभूमी म्हणजे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. तेव्हापासून हा दिवस ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणून साजरा केला जातोय. याच पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच दीक्षाभूमीवर लाखो भीम अनुयायांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. तसंच या निमित्तानं दीक्षाभूमीवर सामूहिक बुद्ध वंदनेसह बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचं वाचन करण्यात आलं.
६७ वा ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’च्या निमित्तानं आज दीक्षाभूमीवर सकाळपासून लाखो भीम अनुयायांची रीघ लागली होती. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून भीम अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल झाले.
इ.स. पू. तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात ‘अशोक विजयादशमी’ म्हणून साजरा केला जातो. सम्राट अशोकांनी केलेली ही मोठी धम्मक्रांती होती आणि त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा करण्याचं ठरवलं. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरमध्ये आपल्या लाखो अनुयायांसोबत त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळं या पवित्र भूमीचं ‘दीक्षाभूमी’ असं नामकरण करण्यात आलं. दरवर्षी लाखो भीम अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल होत असतात.