मोहनवीणेच्या मोहिनीने डोंबिवलीकर मंत्रमुग्ध
डोंबिवली : देवगंधर्व महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा रसिकांनी सुरांची जादू अनुभवली. यावेळी पंडित संजीव अभ्यंकर शास्त्रीय गायन आणि पंडित विश्वमोहन भट मोहनवीणा वादन पार पडले. उशिरापर्यंत रंगलेल्या या मैफलीला रसिकांनी भरभरुन दाद दिली.
कल्याण गायन समाज आयोजित देवगंधर्व महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या मैफलीची सुरुवात पंडित संजीव अभ्यंकर यांच्या गाण्याने झाली. यावेळी त्यांनी राग नट नारायण रसिकांसमोर सादर केला. जबसे छाव या बंदिशीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर निरंकार नारायण ही रचना त्यांनी सादर केली. त्यानंतर राग भिन्न षड्ज लोकांपुढे मांडताना या रागाचे महत्त्व तसेच त्यातील विशेष गुण त्यांनी रसिकांसमोर मांडले. यावेळी तराणा सादर करताना गुणकारी रागामध्ये मूर्च्छना बांधत त्यांनी रसिकांना जसरंगी मैफलीची आठवण करून दिली.त्यांना मिलींद कुलकर्णी संवादिनी आणि अजिंक्य जोशी यांनी तबलासाथ केली. त्यानंतर रंगलेल्या पंडित विश्वमोहन भट यांच्या मोहनवीणा वादनाने सर्व श्रोत्यांना अचंबित केले. राग मारू बिहागमध्ये त्यांनी सादरीकरण केले. मोहनवीणा वाद्यावर त्यांच्या फिरणाऱ्या बोटांनी श्रोत्यांना एका वेगळ्याच दुनियेत नेऊन ठेवलं होतं. सुरुवातीला पारंपारिक सादरीकरणानंतर त्यांनी मोहनविणेवर वंदे मातरम, केसरिया बालम , ओ रे माझी यांसारख्या रचनासुद्धा सादर केल्या. कार्यक्रम संपत आलेला असतानासुद्धा रसिकांनी त्यांच्या सादरीकरणाला दाद देत फर्माईश केल्या. त्यामुळे वेगळं काहीतरी ऐकवण्यासाठी त्यांनी ग्रॅमी पुरस्कार प्राप्त रचना सादर केली त्याचबरोबर आय लव्ह इंडिया ही रचना सादर केली. त्यानंतर मोहनविणेवर राष्ट्रगीत सादर करून कार्यक्रमाचा समारोप त्यांनी केला. सत्यजित तळवलकर यांनी त्यांना तबलासाथ केली. लयकारी, दाणेदार ठेका, प्रभावी साथ आणि त्यामध्ये रंगलेली जुगलबंदी याचा आनंद रसिकांनी यावेळी घेतला. यावेळी अध्यक्ष माधव जोशी आणि उपाध्यक्ष संदीप वैद्य यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला तर श्रीराम केळकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.
————
पहिला दिवस असा रंगला
डोंबिवलीत साजरया होणारया कल्याण गायन समाजाच्या १६ व्या देवगंधर्व महोत्सवाचे उद्घाटन राज्यमंत्री रविंद्रजी चव्हाण, महापौर राजेंद्र देवळेकर, विरोधी पक्ष नेते मंदार हळबे, गायन समाजाचे अध्यक्ष डाँ संदीप जाधव, देवगंधर्व महोत्सव समितीचे अध्यक्ष माधव जोशी आणि उपाध्यक्ष संदीप वैद्य यांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलनाने झाले. पहिल्या दिवशी ग्वाल्हेर व किराणा घराण्याच्या गायकीचा संगम असलेल्या प व्यंकटेश कुमार यांचे यमन रागाने सुरुवात झाली. सुरुवाती पासूनच त्यांनी श्रोत्यांची मने सुमधुर गायकीने पकडून ठेवली. यमन रागाची मोहिनी श्रोत्यांवर पडत असतानाच हमीर नायकी- कानडा, मालकंस ठुमरी, अश्या एकापेक्षा एक राग गाऊन त्यांनी आपल्या गायनाचा आलेख चढताच ठेवला. गाणे संपूच नये असे वाटत असतानाच वेळेचे बंधन अडल्याने भैरवी भजन म्हणून गायन संपवले. संवादिनीवर सुयोग कुंडलकर, तबला साथ मंदार पुराणिक यांनी दिली.