मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी बिहार येथील पाटण्यात देशातील सर्व विरोधी पक्षांची बैठक होत आहे त्या बैठकीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. ‘विरोधकांची ही मोदी हटाव बैठक नाही. ही कुटुंब बचाव बैठक आहे, अशी खरमरीत टीका फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाटण्यात जी बैठक सुरू आहे त्या बैठकीला त्यांनी ‘मोदी हटाव’ असं नाव दिलं असलं तरी ती ‘मोदी हटाव’ नव्हे तर ‘परिवार बचाव’ बैठक आहे. देशातल्या सगळ्या परिवारवादी पार्ट्या एकत्र आल्या आहेत. आपला परिवार कसा वाचू शकेल आणि आपल्याच कुटुंबाकडे सत्ता कशी राहील यासाठी ते प्रयत्न करत आहेत, म्हणूनच ते लोक एकत्र आले आहेत. यांच्यासाठी राज्य चालवणं हा एक धंदा आहे. परंतु भारतीय जनता पार्टीसाठी, नरेंद्र मोदींसाठी ती सेवा आहे.
फडणवीस म्हणाले, ‘विरोधकांनी अशा प्रकारच्या कितीही बैठका घेतल्या, तरी केंद्रात नरेंद्र मोदी हेच येणार आहे’. फडणवीस यांनी ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावरही टीकेचे बाण सोडले. सातत्याने महबुबा मुफ्तीच्या नावाने भाजपाला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे हे मेहबूबा मुफ्ती यांच्यासोबत बैठकीत बसणार आहेत. आता ते काय बोलणार ? असा सवालही फडणवीस यांनी केला.