मुंबई : विश्व संवाद केंद्र, मुंबईतर्फे दरवर्षी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ देऊन गौरव केला जातो. गतवर्षी विजेत्या पत्रकारांना महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते. या वर्षीचा ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ सोहळा शनिवार, २७ जुलै २०२४ रोजी होणार आहे. सोहळ्याचे प्रमुख पाहुणे सुधीर चौधरी (कंसल्टिंग एडिटर – आज तक) असणार आहेत.
माहिती देताना विश्व संवाद केंद्र, मुंबईचे मुख्य संवाद अधिकारी डॉ. निशीथ क भांडारकर म्हणाले की, या सोहळ्याचे हे २३ वे वर्ष आहे आणि त्याच अनुषंगाने या वर्षी पत्रकारिता आणि सोशल मीडिया या क्षेत्राशी निगडित ८ जणांना या पुरस्कारासाठी निवडले आहे. देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार समिती सदस्य अश्विनी मयेकर (संपादक – साप्ताहिक विवेक), प्रसाद काथे (संपादक – जय महाराष्ट्र टीव्ही वाहिनी), ज्येष्ठ पत्रकार प्रणव भोंदे आणि सुधीर जोगळेकर (माजी निवासी संपादक – लोकसत्ता) यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली आहे.
पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे आणि एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या रिपोर्टर प्रज्ञा पोवळे यांना गौरविण्यात येणार आहे.
चिपळूणचे धीरज वाटेकर यांना कोकणचा इतिहास आणि संस्कृती, साहित्यिक चळवळ, पर्यटन, निसर्ग पर्यावरण, सामाजिक जागृती अश्या विविध विषयांवर ब्लॉग आणि पुस्तके लिहिल्याबद्दल तसेच युवा पत्रकार श्रेणीचा पुरस्कार मुंबई तरुण भारतचे अक्षय मांडवकर यांना महाराष्ट्रातील वन आणि वन्यजीव संवर्धन आणि संरक्षण या विषयावरील वस्तुनिष्ठ बातम्या आणि व्हिडिओ रिपोर्टिंगसाठी प्रदान केला जाणार आहे.
फेसबुक आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय विषयांवर सातत्याने लिखाण करणारे ओंकार दाभाडकर, जे स्त्रीपुरुष भेदभाव आणि जातीय असमानता नष्ट करून नवीन पिढीला समानतेसारख्या मुद्द्यांवर आकर्षित करणाऱ्या लेखनासाठी ओळखले जातात. तर गौरव ठाकूर, जे भारतीय इतिहास, राजकारण, विविध सामाजिक समस्यांवर संशोधन करून त्यांचे व्हिडिओ यूट्यूबवर प्रसारित करण्यासाठी प्रसिद्ध आहेत, तसेच इन्स्टाग्रामवरील आपल्या ‘भोजनकट्टा’ हँडलद्वारे समाजाच्या सामाजिक समस्या समाजासमोर आणणारे, तसेच मराठी लघुउद्योजकांना प्रोत्साहन देणारे सचिन गायकवाड यांना या वर्षी देवर्षी नारद पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
याशिवाय मुंबई विद्यापीठातील मराठी पत्रकारितेतील गुणवंत विद्यार्थिनी सुश्री वनश्री राडये यांचाही यावेळी गौरव करण्यात येणार आहे. हा सोहळा २७ जुलै रोजी सकाळी ११:०० वाजता कीर्ती महाविद्यालय सभागृह, काशिनाथ धुरू रोड, वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई येथे होणार आहे. या सोहळ्यात पुरस्कारविजेत्या पत्रकारांना रोख रक्कम, सन्मानपत्र आणि महावस्त्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.