मंडळाच्या दोन हजार पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न

डोंबिवली: 13 ऑक्टोबर:- हिंदुत्वासाठी भाजपलाच सहकार्य करणार असल्याचा निर्धार डोंबिवलीमधील विविध सामाजिक संस्था आणि सार्वजनिक मंडळांनी केला आहे. रविवारी, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून संत सावळाराम क्रीडा संकुल येथे झालेल्या मेळाव्यात मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

मंत्री चव्हाण यांनी “माझे हात बळकट करण्यासाठी साथ द्या,” असे आवाहन केले, ज्यावर प्रतिक्रिया देत उपस्थित मंडळींनी “रविंद्र चव्हाण आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशी घोषणा दिली. त्यांनी पुढे म्हटले की, “भारताला पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सक्षम नेतृत्व आहे आणि जगभरात भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. आता राज्यात महायुतीचे सरकार निवडून आणण्यासाठी सर्वांची साथ महत्त्वाची आहे,” अशा भावनिक सादेला प्रतिसाद देत शेकडो मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपला समर्थन दिले.

तसेच, भाजपच्या १४३ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा देखील रविवारी मंत्री चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मेळावा आयोजित करण्यात आला होता, ज्यात चार हजारांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. हा मेळावा संत सावळाराम क्रीडा संकुलामधील ‘नमो रमो दांडिया रास’ उत्सवाच्या पेंडॉलमध्ये संपन्न झाला.

या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, माजी उपमहापौर राहुल दामले, माजी नगरसेवक मंदार हळबे, मुकुंद पेडणेकर, संदीप पुराणिक, शैलेश धात्रक, विकास म्हात्रे, खुशबू चौधरी, मंदार टावरे, साई शेलार, शशिकांत कांबळे, नंदू परब, विनोद काळण, राजन आबाळे, समीर चिटणीस, विश्वदिप पवार, राजू शेख, निलेश म्हात्रे, पूनम पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री चव्हाण यांनी आगामी निवडणुकीसाठी प्रचार कसा करावा, मतदारांपर्यंत कोणते मुद्दे पोहोचवावे, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी जय श्रीराम, वंदे मातरम आणि भारत माता की जय या घोषणांनी सभामंडपात जोश निर्माण झाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *