मुंबई, दि. १ः विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या (चौथ्या ) दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात निदर्शने केली. राज्य सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात घोषणांचा सुकाळ शेतकऱ्यांसाठी निधीचा दुष्काळ आहे. एकंदरीत अर्थसंकल्पात गोलमाल कंत्राटदार मालामाल अशा घोषणा विरोधकांनी दिली. जनतेवर कर्जाचा डोंगर, शेतकऱ्यांवर अन्याय, राज्याला कर्जबाजारी आणि कामगारांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या, जुनी पेन्शन बद्दलखोटे आश्वासन, दुष्काळ सदृष्यस्थितीत पाणी न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा आक्रमक घोषणा विरोधकांनी दिल्या. विकासाच्या नावाखाली जनतेची घोर फसवणूक सरकारने केली.
‘अर्थसंकल्पात गोलमाल, कंत्राटदार मालामाल, सत्ताधारी आमदार तुपाशी, जनता उपाशी, पिक- विमा कंपन्या जोमात शेतकरी कोमात, विक्रमी पुरवणी मागण्या, आमदार फोडण्यासाठी आणि फोडलेले सांभाळण्यासाठी घोषणा अशा आशयाचे फलक हातात घेऊन विरोधकांनी निदर्शने केली.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, आमदार सतेज बंटी पाटील, अभिजित वंजारी, नितीन राऊत, विकास ठाकरे, संग्राम थोपटे, सुरेश वरपुडकर, प्रतिभा धानोरकर, शिवसेनेचे (ठाकरे) सचिन अहिर, रमेश कोरंगावकर, विलास पोतनीस, सुनील शिंदे, राजन साळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) रोहित पवार, सुनील भुसारा आदी आंदोलनात सहभागी झाले होते.