डेांबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील MIDC निवासी विभागातील नागरिक गेली अनेक वर्षे खड्डेमय रस्ते, अनियमित/अनियंत्रित पाणी पुरवठा, प्रलंबित मलनिस्सारण रचना, विजेचा लपंडाव आणि स्वच्छता या महत्वाच्या समस्यांवर तोडगा काढावा यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु त्यांच्या या सर्व मागण्यांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने डोंबिवलीकर रस्त्यात उतरणार आहेत डोंबिवली MIDC निवासी विभाग दक्ष नागरिक मंचच्या वतीने रविवार २४ ऑक्टोबर रोजी नागरिक मूक आंदोलन करणार आहेत.
डोंबिवली MIDC निवासी विभाग दक्ष नागरिक मंचच्या समूहाने या भागात राहणाऱ्या अनेक नागरिकांसोबत चर्चा करून या परिस्थितीबाबत संबंधित प्रशासकीय यंत्रणांना जाब विचारण्यासाठी आंदोलनाची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. सदर भागातील नागरिक रविवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ रोजी मूक आंदोलन करणार असून, कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करताना कोणतीही गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे,तश्या सूचना नागरिकांना वेळोवेळी देण्यात येत आहेत. सर्व नागरिक रस्त्याच्या दुतर्फा दहा दहा फुटाच्या अंतरावर निषेध फलक घेऊन उभे राहतील अशी रचना करण्यात आली आहे. सदर आंदोलनासाठी डोंबिवली MIDC निवासी विभाग दक्ष नागरिक मंचच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. सदर आंदोलनासाठी डोंबिवली MIDC निवासी विभाग दक्ष नागरिक मंचच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून हा मंच पूर्णतः अराजकीय असून, सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन दबावगट म्हणून काम करणाऱ्या नागरिकांचा समूह असल्याची माहिती दक्ष नागरिक मंच (MIDC परिसर) चे विजय मेटकर, अतुल रायकर, वैभव जोशी आणि अतुल मोडक यांनी दिली.
दर महिन्यात २ ते ३ वेळा सदर भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्या फुटतात आणि त्यामुळे त्या नंतर ३ / ४ दिवस कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचा येथील नागरिकांचा अनुभव आहे. खड्डेमय रस्ते ही समस्या तर पूर्ण डोंबिवलीची असून इथल्या नागरिकांनी गेले अनेक वर्षे याबाबत आवाज उठवला आहे. अनेक वेळा रस्त्यांसाठी निधी मिळाल्याच्या बातम्या नागरिकांपर्यंत येतात पण महापालिका आणि MIDC यांच्याकडे पाठपुरावा केला असता याबाबतची जबाबदारी एकमेकांवर ढकलली जाते मात्र नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे अशी नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.