मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे दोन वर्षापासून सैन्य भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही. त्यामुळे मुलांची वयोमर्यादा संपत चालली आहे. सैन्य भरती तात्काळ व्हावी यासाठी आ. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली सैन्य भरतीचा सराव करणारे विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट झाल्यानंतर त्यांनी तात्काळ सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी व सर्व पोलिस अधीक्षक यांना तात्काळ सैन्य भरती भरती घेणेबाबतचे निर्देश दिले.
महाराष्ट्रातील लाखो तरुण भरतीसाठी पर्व तयारी करत आहेत. जर याबाबत वेळीच नियोजन न केल्यास वयोमर्यादा संपल्यामुळे अनेक तरुणांचे भवितव्य अंधकारमय बनेल. तरी देशसेवा करण्याची इच्छा असणा-या तरुणांच्या बाबतीत शासनाने तातडीने लक्ष घालावे याकडे उपमख्यमंत्रयाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी रयतचे युवा नेते सागर खोत, युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे, राहुल पाटील, आनंदराव पवार, सत्यजित कदम, आकाश राणे, विजय पाटील, अजय सुरवसे इ. उपस्थित होते.
या केल्या मागण्या …
(१) लगतच्या कर्नाटक, गुजरात राज्यांमध्ये गेल्या वर्षी पासून भरती प्रक्रिया सुरु आहे. तरी महाराष्ट्रामध्ये भरती प्रक्रिया त्वरित सुरु करावी. ती भरती प्रक्रिया पुढे ढकलू नये.
२) प्रत्येक जिल्ह्यात भरती प्रक्रिया करावी. त्यामुळे गर्दी होणार नाही आणि मुलांना देश सेवा करण्याची संधी मिळेल.
३) संरक्षण मंत्रालयाकडून यापूर्वी ५ मार्च २०२१ ते २४ मार्च २०२१ रोजी सैन्यभरतीचा कार्यक्रम पाठवण्यात आला होता. परंतु महाराष्ट्रात याची अंमलबजावणी झाली नाही. तसेच पुणे ए आर ओ चा सैन्यभरतीचा कार्यक्रम ७ सप्टेंबर २०२१ ते २४ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आला होता, पण तो ही राबविण्यात आला नाही. कोल्हापूर ए आर ओ चा सैन्य भरती कार्यक्रम १ डिसेंबर २०२१ ते २२ डिसेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आला आहे, तरी सदर भरतीसाठी कोरोनाची सर्व खबरदारी घेऊन (RTPCR टेस्ट करून) सैन्य भरती सुरु करावी.