ठाणे, भिवंडी परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ओवळा – बंगलापाडा खाडीवर पुलाची मागणी
भिवंडी : भिवंडी, ठाणे परिसरातील रोजच्या जीवघेण्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होण्यासाठी ओवळा (भाईंदर पाडा) ते मालोडी (बंगलापाडा) या दरम्यान खाडी पुल बांधण्याची मागणी राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते विशाल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीय.
ठाणे, मुंबई, नवीमुंबई येथे रोजची ये -जा करण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी वाढली आहे. व्यवसाय, नोकरीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करीत आहेत. मात्र रस्ते सुविधा अपुऱ्या असल्याने वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना रोजच करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी शासनाने ओवळा ( भाईंदर पाडा ) ते मालोडी ( बंगलापाडा ) या दरम्यानच्या खाडीपात्रावर नवीन पूल बांधल्यास नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
ठाणे हद्दीतील ओवळा ,भाईंदरपाडा तसेच भिवंडी , वसई परिसरात मोठमोठे निवासी प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामुळे या पुलामुळे येथील रहिवाश्यांसह मुंबई अहमदाबाद महामार्गावरून वाहतूक करणारी वाहने तसेच वसई तालुक्यातील कामण, शिलोत्तर , नागले , पोमण , डोंगरीपाडा, मोरी तसेच भिवंडी तालुक्यातील पाये ,पायगांव , खार्डी , मालोडी , खारबांव , गाणे , फिरिंगपाडा ,टेंभवली , जुनांदुर्खी , लाखीवली , धामणे , माजिवडे , पालिवली ,कुहे , चिंबीपाडा , कांबे , वडूनवघर , डुंगे , कालवार , कारिवली , वडघर आदी गावांतील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने गायमुख खाडीच्या ओवळा ते मालोडी खाडीपात्रावर पूल बांधून वाहनधारकांसह नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी पाटील यांनी केलीय.