दिल्ली : दिल्ली एमसीडीच्या एकत्रीकरणानंतर पहिल्यांदाच महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. देशाच्या राजधानीच्या महापालिकेवर कुणाची सत्ता येणार हे ठरवणारी हि निवडणूक असल्याने महत्वाची ठरत आहे. मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. मुंबई काबीज करण्यासाठी भाजपची दिल्लीतून रणनिती आखली जात आहे. त्यामुळे  दिल्ली महापालिकेच्या निकालाकडे दिल्लीवासियांबरेाबरच महाराष्ट्रवासियांच्या नजरा लागल्या आहेत.  

 रविवारी सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत ३० टक्के मतदान झाल होतं. दिल्ली महानगरपालिकेच्या २५० प्रभागांमध्ये  १३४९  उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.  भाजप, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत हेात आहे. दिल्लीत तीन महानगरपालिका होत्या. उत्तर दिल्ली महानगरपालिका, दक्षिण दिल्ली महानगरपालिका आणि पूर्व दिल्ली महानगरपालिका असे तीन भागात विभागणी झाली होती. त्या तीन महानगरपालिकांची एक महापालिका करण्यात आली आहे. या तिन्ही महापालिका भाजपच्या ताब्यात होत्या तर दिल्लीत आपची सत्ता आहे त्यामुळे भाजप विरूध्द आप असा सामना रंगला आहे.     त्यामुळे यंदाची निवडणूक महत्वाची ठरत आहे. एकूण १३ हजार ६६५ मतदान केंद्रे उभारण्यात आले असून, १ कोटी ४६ लाख ७३ हजार ८४७ मतदार आहेत. या निवडणुकीचा निकाल ७ डिसेंबरला लागणार आहे त्यामुळे या निकालाकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटूंबासह मतदान केले.

आता दिल्ली सर्वात मोठी महापालिका 

बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात मोठी महानगरपालिका होती. मात्र दिल्लीतील  तिन्ही महानगरपालिकांच्या एकत्रीकरणानंतर आता दिल्ली महानगरपालिका ही देशातील सर्वात मोठी महानगरपालिका ठरली आहे. बृहन्मुंबई महापालिका प्रभागांची संख्या २२७ वरुन २३६ करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला होता. या निर्णयावर शासकीय अध्यादेशही जारी करण्यात आला होता. मात्र सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारनं हा निर्णय बदलला आणि  पुन्हा महापालिकेची प्रभाग संख्या २२७ ठेवण्याचा निर्णय जारी करत तसा कायदाच केला. या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर येत्या २० डिसेंबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे प्रभागांचा तिढा सुटत नाही तोपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम खोळंबून राहिला आहे. 

दिल्लीनंतर, मिशन मुंबई ….

मुंबईसह राज्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण डेांबिवली आदी प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. शिवसेनेत फूट पाडून राज्यात सत्तांतर घडवून आणल्यानंतर मुंबई महापालिका जिंकण्याची रणनिती  भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडून आखली जात आहे. गणेशोत्सवात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबाग राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आले होते. त्यावेळी शहा यांनी  मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात भाजप पदाधिका-यांशी चर्चा केली हेाती. गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून ती काबीज करण्यासाठी भाजप यावेळी खूपच मेहनत घेत आहे. मुंबई दौ-यात शहा यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली हेाती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ११ डिसेंबरला नागपूर दौ-यावर येत आहेत. मोदी यांच्या हस्ते हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडीने मोट बांधली आहे. शिवसेनेने वंचित बहुजन आघाडीला हाक दिली आहे. शिवशक्ती व भीमशक्ती एकत्रीत आल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे दिल्लीनंतर, देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबईच्या महापालिकेची निवडणूक हेच मिशन असणार आहे. त्यामुळे दिल्लीचा निकाल हा महत्वाचा ठरणार असून, या निकालाकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!