डोंबिवली : गणेश मंदिर संस्थानातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही त्रिपुरारी पौर्णिमे च्या मुहूर्तावर दीपोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. गणेश मंदिराच्या शेकडो प्रज्वलित दिव्यांनी उजळलेल्या या गाभाऱ्याचे शेकडो नागरिकांनी श्रद्धेने दर्शन घेतले.
या उत्सवाच्या निमित्ताने गणेश मंदिर संस्थानाच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट तसेच इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने, खाद्यतेलाचे दान मोहीमेअंतर्गत स्वीकारलेले खाद्यतेल संबंधित संस्थांना गोरगरीब जनतेच्या वाटपासाठी सुपूर्द करण्यात येईल.शिवप्रेमी,अभ्यासक, संशोधक,अग्रणी शाहीर पार्थिव अर्थाने आज आपल्यात नाहीत. त्यांची स्मृति सर्व महाराष्ट्रप्रेमींच्या हृदयातून तेवत राहणार आहेच. डोंबिवलीसारख्या सुसंस्कृत नगरीला तर शिवशाहीर कै. बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी विशेष जिव्हाळा असल्याने जसा २००५ सालच्या दीपावलीत डोंबिवलीत जशी शिवराज्याभिषेकाची महारांगोळी रेखून शिवबाला कुर्निसातच केला गेला होता तसाच मुजरा आज सोळा वर्षांनी याच शिवभक्ताची स्मृति ग्रामदैवताच्या चरणी सुप्रसिद्ध कलाकार उमेश पांचाळ यांच्या कलारेखाटनाद्वारे रांगोळी प्रत्यक्षात साकार करण्यात आली.
गणेश मंदिर संस्थानचे विश्वस्त,अध्यक्ष राहुल दामले, रोटरीचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील, इनरव्हील अध्यक्षा राजसी मोहिते, प्रकल्प प्रमुख मनीषा शिंदे,गंधाली निगुडकर, सचिव शैलेश गुप्ते, ज्योती दाते इत्यादींच्या सहकार्य आणि प्रयत्नांनी हा सोहळा यशस्वीपणे पार पडला.