आदिवासी शाळांकरिता क्रीडा शिक्षकाची नियुक्ती करणार : विष्णू सवरा
ठाणे : खेळांचे महत्व वाढावे यासाठी प्रत्येक आदिवासी शाळांकरिता क्रीडा शिक्षकाची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी आज दिली. शासकीय अनुदानित आश्रमशाळा विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ आज शहापूर तालुक्यातील मोहिली-अघई येथे झाला त्याप्रसंगी ते बोलत होते. आत्मा मालिक शैक्षणिक संकुल येथे या स्पर्धा सुरु आहेत. प्रधान सचिव आदिवासी मनीषा वर्मा आणि आदिवासी आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, अपर आयुक्त चंद्रकांत डांगे यांची यावेळी उपस्थिती होती.
या स्पर्धांमध्ये ८९० मुले आणि ८५२ मुली असे १ हजार ६४२ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. अभ्यासाबरोबर शरीरही चांगले असावे असे सांगून विष्णू सवरा म्हणाले की खेळाला महत्व देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आलेल्या आव्हानांचा सामना करून प्रगती करावी व ध्येय गाठावे. सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत हिचे उदाहरण देऊन ते म्हणाले की, आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण असतात त्यांना संधी मिळाली की ते चमकतात. आदिवासी विद्यार्थ्यांचे इंग्रजी सुधारण्यासाठी आदिवासी विकास विभागाने एका संस्थेची नियुक्ती केली आहे. तसेच खेळासाठीचे २५ गुण आणि नोकरीत आरक्षण देखील देण्यात येत आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्यात आदिवासींची ४९१ वसतिगृहे असून त्यात वाढ करण्यात येत आहे असेही त्यांनी सांगितले. आदिवासी विकासाच्या दृष्टीने एकलव्य संस्थेला काम दिले आहे. शिक्षणापासून कुणीही वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करणार आहोत. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास करण्यात येऊन रोजगारभिमुख करणार आहोत असेही त्यांनी सांगितले.
मनीषा वर्मा म्हणाल्या की आदिवासींमध्ये नैसर्गिक शक्ती असते, बुद्धिमत्ता असते मात्र त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. व्हिजन २०३० मध्ये आदिवासी आश्रमशाळांतील मुले ऑलिम्पिकमध्ये खेळवीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. २५०० शिक्षकांना जीवन कौशल्य प्रशिक्षण दिल्याची माहितीही त्यांनी दिली. चंद्रपूर अश्रामशाळेचे विद्यार्थी माउंट एव्हरेस्टवर चढाई करण्याची तयारी करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल हैडबॉल, धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक असे सांघिक व वैयक्तिक खेळ सुरु असून २१ तारखेस बक्षीस वितरण होणार आहे. प्रारंभी दीपप्रज्वलन आणि त्यानंतर मशाल पेटवून ध्वजारोहण करण्यात आले. खेळाडूंनी यावेळी शपथ घेतली. नाशिक आदिवासी विकास आयुक्तांनी आभार मानले.