मुंबई : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगर परिसरात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी येतात. या दिवशी सर्वांनाच चैत्यभूमीवर अभिवादन करणं शक्य व्हावं यासाठी मुंबई शहर उपनगर परिसरातील सरकारी कार्यालयांसह खासगी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्याची मागणी आमदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून ६ डिसेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगर जिल्हयांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. हे आदेश मुंबई शहर आणि उपनगर जिल्हयातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना लागू राहणार आहेत.
शासनाने परिपत्रकात म्हटले आहे की, १८ सप्टेंबर १९९६ अन्वये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सरकारी व निमसरकारी कार्यालयांना प्रतिवर्षी अनंत चतुर्दशी दिवशी व २००७ पासून गोपाळकाळा (दहीहंडी) निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आता २०२३ मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व सरकारी व निमसरकारी कार्यालयांना तिसरी स्थानिक सुट्टी देण्यात येत आहेत.