पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप
कल्याण – कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दीपक भिंगारदिवे या ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याने दीपक यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केलाय. मात्र पोलिसांनी हे सगळे आरोपी फेटाळले आहेत. याप्रकरणी अकामिक मृत्यूची नोद करण्यात आली असून, पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, कल्याण पूर्व मध्ये कोळसेवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अचानक धरपकड (ऑपरेशन ऑल आऊट) मोहीम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान प्रशिक भिंगारदिवे (२४) या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले होते. मुलगा प्रशिक्षक याला पोलीस ठाण्यात अचानक नेण्यात आल्याने त्याचे वडील दीपक भिंगारदिवे (६३) यांनी पोलिस ठाण्यात जाऊन मुलाला पोलीस ठाण्यात का आणले म्हणून चौकशीसाठी गेले होते.यावेळी प्रशिक्षची पोलीस चौकशी करत असताना त्याचे वडील दीपक त्यांच्या मोबाईलमधून पोलीस करत असलेल्या चौकशीचे मोबाईल मधून चित्रीकरण करत होते. दीपक यांनी मोबाईल मधून चित्रीकरण करू नये म्हणून पोलिसांनी त्यांना समजावले. त्यांना पोलीस ठाण्यातील अंमलदार कक्षामागील भागात बसविण्यात आले होते. तेथे त्यांना अचानक फिट आली. ते जमिनीवर कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मात्र पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुुटुंबियांनी केला आहे.जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा भिंगारदिवे यांच्या कुटुंबाने घेतला आहे. दीपक यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचा खरं कारण समोर येईल अस पोलिसांनी स्पष्ट केलय.
प्रकरणाची सखोल चौकशी सुरू
भिंगारदिवे कुटुंबियांनी केलेले आरोप पोलिसांनी फेटाळून लावले आहेत.या प्रकरणाची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱी यांच्यामार्फत चौकशी करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद झाला आहे. ती सर्व माहिती तातडीने गुन्हे शाखा, न्यायदंडाधिकाऱ्यांना चौकशीसाठी देण्यात आली आहे, असे पोलीस उपायुक्त सचीन गुंजाळ यांनी सांगितले.