फरार हल्लेखोर चतुर्भुज, खडकपाडा पोलिसांनी ठोकल्या 6 तासांत बेड्या

कल्याण : रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडे असलेल्या कोळीवलीतील एका चाळीत राहणाऱ्या २० वर्षीय महिलेच्या घरात शिरून अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने हल्ला करुन तिला गंभीर जखमी केले. खडकपाडा पोलिसांनी या महिलेवर जीवघेणा हल्ला करून पसार झालेल्या हल्लेखोराला अवघ्या सहा तासांत बेड्या ठोकून गजाआड केले आहे.

या महिलेवर हल्ला करणाऱ्या हरीश नरेंद्र जोशी (२७) याला गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक शरद झिने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अटक करण्यात यश मिळविले आहे.

कोळीवली रोडला असलेल्या चाळीत ही महिला पतीसह राहते. तिचा त्याच भागातील एका बेकरीमध्ये नोकरी करतो. रविवारी रात्री तो बेकरीत काम करण्यासाठी गेल्यानंतर महिला घरात एकटीच झोपली होती. घराच्या खिडकीतून अज्ञात इसम धारदार शस्त्र घेऊन आला. त्याने या महिलेवर सपासप वार केले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे महिला भयभीत झाली. मदतीसाठी तिने चोर चोर म्हणून ओरडाओरडा करताच हल्लेखोराने खिडकीतून उडी मारून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. या प्रकाराची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन माहिती घेतली. गळ्यावर आणि हातांवर वार झालेल्या जखमी महिलेला तात्काळ रूग्णालयात दाखल केले.

सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरद झिने, सपोनि अनिल गायकवाड व त्यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासून या प्रकरणाचा तपास सुरू केला. हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. विशेष म्हणजे हल्लेखोराबाबत कोणताही सुगावा नसतानाही पोलिस पथकाने घटना घडल्यापासून अवघ्या 6 तासांच्या आत आरोपी निष्पन्न करून त्याला अटक केल्याचे पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी सांगितले. सदर महिलेवर आरोपीने हल्ला का केला ? याचा चौकस तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!