मुंबई : शिवसेनेच्या आमदार अपात्रप्रकरणी सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीत कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले होते. या सुनावणीतही न्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना फटकारले असून त्यांना माध्यमांमध्ये बोलायला वेळ आहे, पण सुनावणीसाठी वेळ नाही का ?” अशा शब्दात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत सुधारित वेळापत्रक सादर करण्याची अंतिम मुदत सर्वोच्च न्यायालयाने दिली.
शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी दोन महिन्यांत सुनावणी घेणार असल्याचे वेळापत्रक राहुल नार्वेकर यांनी तयार केले होते. सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळून लावत, १३ ऑक्टोबरपर्यंत सुधारित वेळापत्रक तयार करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, मंगळवारी झालेल्या सुनावणीपूर्वी अध्यक्षांकडून वेळापत्रक सादर करण्यात आले नाही. त्यामुळे सरन्यायाधिशांनी नार्वेकरांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली.
येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत वेळापत्रक सादर करण्यासाठी शेवटची संधी देत आहोत. दसऱ्याच्या सुट्टीत सॉलिसिटर जनरल अॅड. तुषार मेहता यांच्यासोबत बसून विधानसभा अध्यक्षांनी नवे वेळापत्रक बनवावे. पुढील सुनावणीपर्यंत हे वेळापत्रक आले नाही तर नाईलाजाने हस्तक्षेप करावा लागले. तसेच स्वत: वेळापत्रक देण्यात येईल, असे न्यायालयाने सांगत अध्यक्षांना खडसावले.