डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पग्रस्तांच्या नुकसान भरपाईचा निर्णय तातडीने घ्यावा : खासदार शिंदे यांची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मागणी
ठाणे – केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पामुळे डोंबिवलीनजीकच्या प्रकल्पग्रस्तांची ससेहोलपट होत असून, नुकसान भरपाईचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांच्या उपस्थितीत केली. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील विविध प्रवासी सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण राज्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी खा. डॉ. शिंदे बोलत होते.
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशनच्या (डीएफसीसी) वतीने प्रकल्पग्रस्तांना घराच्या बदल्यात घर देण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे मध्य रेल्वे या प्रकल्पग्रस्तांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या मनात भीतीचे वातावरण असून घराच्या बदल्यात घर देण्याच्या धोरणाला तातडीने मंजुरी देण्याची आग्रही मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली. तसेच, हे धोरण मंजूर होईपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे निर्देश मध्य रेल्वेला देण्याची विनंतीही त्यांनी गोहेन यांना केली.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात कल्याण लोकसभा मतदारसंघातील मुंब्रा स्थानकातील आपत्कालीन वैद्यकीय कक्ष, डोंबिवली स्थानकातील विनामूल्य वायफाय सेवा आणि कल्याण स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ४/५ आणि ६/७ येथील एकूण तीन लिफ्ट्स आणि स्वच्छतागृह यांचे उद्घाटन, तसेच ठाकुर्ली स्थानकातील बुकिंग ऑफिस आणि एस्कलेटर यांचे लोकार्पण रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन आणि खा. डॉ. शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सर्व रेल्वे स्थानकांवर वैद्यकीय कक्ष सुरू करण्याची मागणी खा. डॉ. शिंदे सातत्याने करत असून त्यानुसार कल्याण आणि डोंबिवली स्थानकात यापूर्वीच कक्ष सुरू झाले आहेत. बुधवारी मुंब्रा स्थानकातील कक्षाचे उद्घाटन झाले असून कळवा, दिवा, उल्हासनगर आणि अंबरनाथ या स्थानकांमधील वैद्यकीय कक्षही लवकरच सुरू होणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. खा. डॉ. शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे ठाकुर्ली स्थानकाचा कायापालट होऊन बुकिंग ऑफिस, स्कायवॉक आणि एस्कलेटरचा वापर यापूर्वीच प्रवाशांसाठी खुला करण्यात आला होता. बुधवारी रेल्वेने या सुविधांचे औपचारिक लोकार्पण केले.
‘पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम जलदगतीने पूर्ण करा’
ठाण्याच्या पुढील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पाचवी आणि सहावी मार्गिका टाकण्याचे काम मुदतीत पूर्ण व्हावे, यासाठी पावले उचलण्याची विनंतीही खा. डॉ. शिंदे यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांना केली. हे काम पूर्ण झाल्यावर उपनगरी सेवेच्या किमान ५० फेऱ्या वाढवता येणार असून त्यामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार असल्यामुळे आपण सातत्याने हे काम मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, ठाकुर्ली टर्मिनस आणि कळवा-ऐरोली एलिव्हेटेड मार्गाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.