नागरी सोयी सुविधांसाठी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासींचे नृत्य आंदोलन
ठाणे (प्रतिनिधी)- देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षे झाली आहेत. मात्र, अद्यापही कोपर्याची वाडी या अंबरनाथ तालुक्यातील आदिवासींना नागरी सोयी सुविधांपासून वंचित आहेत. या निषेधार्थ येत्या २६ जानेवारी रोजी आदिवासी बांधवांकडून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी नृत्य आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सुमारे ५०० आदिवासी सहभागी होणार आहेत. ओबीसी एकीकरण समितीनेही या आंदोलनाला पाठिांबा दिला आहे. राजाभाऊ चव्हाण आणि ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक प्रफुल वाघोले यांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
कोपर्याची वाडी हा आदिवासी पाडा इंग्रजी राजवटीच्या आधीपासूनच आहे. येथील आदिवासी बांधवांना नागरी सुविधांची पूर्तताच करण्यात आलेली नाही. सबंध अंबरनाथ तालुका नागरीकरणात आघाडीवर असला तरीही कोपर्याची वाडी येथे पायवाटा, नळपाणीपुरवठा योजना, दवाखाने आदी कोणत्याही व्यवस्था या ठिकाणी नाहीत. या गावात एक शाळा आहे. मात्र, या शाळेपर्यंत पोहचण्यासाठी सुयोग्य रस्ता नसल्याने शिक्षकही गावात येत नाहीत. परिणामी, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. एखादी व्यक्ती आजारी पडल्यास रुग्णवाहिका आदिवासी पाड्यात येऊ शकत नसल्याने रुग्णांना किंवा गरोदर महिलेला डोली करुन गुडघाभर चिखलातून न्यावे लागत आहे. त्या प्रयत्नात अनेकांना आपली इहलोकीची यात्रा संपुष्टात आणावी लागत आहे. सन 2017 मध्ये या गावाला कल्याण अंबरनाथशी जोडण्यासाठी पुलाचे बांधकाम करुन त्याचे लोकार्पण करण्यात आलेले आहे. मात्र, या पुलाला जोडरस्ताच तयार करण्यात आलेला नसल्याने हा पूल म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा झाला आहे. जोपर्यंत सोयी सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.