डोंबिवली – वाढत्या सायबर गुन्ह्याला आळा घालण्यासाठी कल्याण डोंबिवलीत विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. कल्याण पोलीस परिमंडळ झोन – ३ अंतर्गत रामनगर डोंबिवली पोलीस ठाण्यात या मोहिमेला सुरुवात केली असून गेल्या वर्षभरात या झोन मध्ये सायबर संदर्भात हजार गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली शहरासाठी विशेष सायबर सेलची व्यवस्था कशी करता येईल यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा केली जाईल असे सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी मोरे यांनी सांगितले.
बँकेचा प्रतिनिधी बोलतोय असा फोन करून तुमच्या बँक खात्याचे केवायसी करून घ्या नाहीतर खाते बंद होईल असे सांगून फसवले जाते. तसेच फेसबुक , इंस्टाग्राम यासारख्या समाज माध्यमावर असलेले खाते हॅक करून फसवले जाते. लॉटरी लागली किंवा ऑनलाईन लोन अशी प्रलोभने दाखवून नागरिकांना भुलवले जाते. सैन्य दलात आहे असे सांगितले जाते त्यामुळे नागरिकांनी या सगळ्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन यावेळी जे. डी. मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
विशेष म्हणजे या आर्थिक गुन्ह्याची उकल करणे अतिशय अवघड असून नागरिकांनी सावध राहावे असे सांगण्यात आले आहे . ही जनजागृती चौकाचौकात करण्यात येणार असून अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ , सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे, यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पोलीस निरीक्षक सुरेश सरडे, गोपनीय विभागाचे सुनील खैरनार, गणेश बोडके, गणेश गीते यांनी या जनजागृती साठी पुढाकार घेतला आहे.