डोंंबिवली : कल्याण-शिळ रोडवर असलेल्या गोळवली भागातील रिगल लेडिज सर्व्हिस बारमध्ये शनिवारी रात्री दोन ग्राहकांना या बारमधील वेटर आणि मॅनेजरने धक्काबुक्की करत दांडक्याने मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. ग्राहकाच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी हाॅटेलच्या चार वेटरांच्या विरुध्द गु्न्हा दाखल केला आहे.
आनंदकुमार सिंग आणि तीन अशी आरोपींची नावे आहेत. खोणी पलावा भागात राहणारे आयुश सुधाकर शेट्टी (१९) याने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तर बारचा मॅनेजर आनंदकुमार याच्याही तक्रारीवरून पोलिसांनी बारमध्ये तोडफोड करणाऱ्या ग्राहकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार आयुश आणि त्याचा मित्र रोहन कांबळे दारू पिण्यासाठी रिगल लेडिज बारमध्ये गेले होते. दारू प्यायल्यानंतर झिंगलेला रोहन कांबळे हा तेथील नृत्य गायन सुरू असलेल्या मंचकावर गेला. हा प्रकार सहन न झाल्याने बारमधील एका कर्मचाऱ्याने रोहनला मंचकावरून खाली ओढले. त्याचा राग येऊन आयुशने कर्मचाऱ्याला फैलावर घेतले. त्याचा राग कर्मचाऱ्याला आला. त्याने तक्रारदाराला धक्काबुक्की केली. त्यावेळी बारमधील इतर दोन जण आयुश यांंच्याजवळ आले. त्यांनी त्याला मारहाण केली. आयुशला भोजन कक्षात नेऊन तेथे आनंदकुमार सिंग यांनी बेसबाॅल खेळण्याच्या काठीने बेदम मारहाण केली. तक्रारदाराच्या पायाला या मारहाणीत दुखापत झाली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.