मुंबई : क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील साक्षीदार असलेला प्रभाकर साईलने एनसीबीवर धक्कादायक आणि गंभीर आरोप केल्याने या प्रकरणाला आता नाटयमय वळण लागलंय. मात्र एनसीबीने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून या ‘प्रकरणाचा तपास सुमोटो पद्धतीने महाराष्ट्र पोलिसांनी करावा’ अशी मागणी केलीय.. त्यामुळे समीर वानखेडे चौकशीच्या घे-यात अडकणार का ? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.
ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला आर्यन खान याची सुटका करण्यासाठी एनसीबीकडून २५ कोटी रूपयांची मागणी केल्याचा आरोप साक्षीदार प्रभाकर साईलने केलाय. यातील आठ कोटी रूपये हे एनसीबीचे डायरेक्टर समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते असा गौप्यस्फोट ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार असलेला साईलने केल्याने खळबळ उडालीय. आर्यन खानला एनसीबीने पकडले त्यावेळी मी केपी गोसावी यांच्याबरोबरच होतो. त्यावेळी मला पंच म्हणून बोलविण्यात आले. समीर वानखेडे यांनी माझी कोर्या कागदावर सही घेतली, या कागदावर काय लिहिण्यात आले याची मला माहिती नाही. को-या कागदावर सही कशी करणार अशी विचारणाही केली. त्यावेळी त्यांनी काहीही होत नाही, असे म्हटल्याचे साईल यांनी सांगितलय.
प्रभाकर साईल कोण आहे ?
ड्रग्ज प्रकरणातील ९ साक्षीदारांच्या यादीतील प्रभाकर साईल एक साक्षीदार आहे. २२ जूलै २०२१ पासून किरण गोसावी यांच्याकडे बॉडीगार्ड म्हणून काम करीत होते. ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार केपी गोसावी याचा आर्यन खानबरोबरील सेल्फी व्हायरल झाला होता.
एनसीबीने आरोप फेटाळले..
साक्षीदार प्रभाकर साईल यांनी NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंवर खंडणीचे आरोप केल्यानंतर आता NCB चे उपमहासंचालक अशोक मुथा जैन यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केलंय. प्रभाकर साईल यांचे आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळले आहेत असं पत्रकात म्हटलंय तसेच प्रभाकर साईल साक्षीदार असल्याने त्यांनी हे प्रतिज्ञापत्र कोर्टासमोर दाखल करायला हवं होतं, असंही ते म्हणाले. मात्र, साईल यांच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती NCB च्या महासंचालकांना पाठवतोय आणि त्यांना पुढील कारवाईची विनंती करतोय,” असंही अशोक मुथा जैन म्हणाले. तर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी पोलिस महासंचालक संजय पांडे आणि मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना एक पत्र लिहिल्याची माहिती मिळतेय. ड्रग्स प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवलं जातं आहे, असा आरोप वानखेडे यांनी या पत्रात केलाय.