डोंबिवली : कमी कालावधीत परतावा देण्याचे अमिष दाखवून 9 ते 10 हजार गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या ठगास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. आदित्य हेमंत रेडीज (26) असे या ठगाचे नाव असून कल्याण कोर्टाने त्याला अधिक चौकशीकरिता सोमवारी 31 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


     बदलापूर पश्चिमेतील रमेशवाडी परिसरात असलेल्या ओम प्रथमेश सोसायटीत आरोपी आदित्य रेडीज हा राहतो. कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा भागातल्या अमृतपार्क सोसयटीत राहणाऱ्या रेखा प्रभाकर झोपे (57) या महिलेने 30 नोव्हेंबर 2020 रोजी डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या संदर्भात भादंवि कलम 420, 406, 409, 34 सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थेच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3, 4 अन्वये गुन्हा दाखल केला. नंतर हा गुन्हा ठाण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला.


      गुन्हे अन्वेषण विभागाचे वपोनि प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि समीर शेख आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. आरोपी आदित्य रेडीज याने याच गुन्ह्यात यापूर्वी अटक केलेल्या अरूण गांधी व सद्या भूमिगत असलेल्या अन्य साथीदारांसह संगणमत करुन संपर्क अॅग्रो मल्टी स्टेट को-ऑप सोसायटी लिमिटेड (आधीचे नाव कालीकाई ॲग्रो मल्टी स्टेट सोसायटी) कंपनी सुरू केली होती. यातील तक्रारदार रेखा झोपे व अन्य गुंतवणूकदारांना कमी कालावधीत चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठेवींपोटी रक्कमा उकळल्या. या कंपन्यांत तक्रारदार रेखा झोपे व अन्य गुंतवणूकदारांनी मिळून 35 लाख 38 हजार 350 रुपयांची गुंतवणूका केल्या. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने आतापर्यंत केलेल्या तपासात सदर कंपन्यांनी जवळपास 9 ते 10 हजार गुंतवणुकदारांची अंदाजे 22 ते 23 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.


     यातील मुख्य आरोपी आदित्य रेडीज याच्यासह त्याचे वडील हेमंत रेडीज व आई मानसी रेडीज हे तिघेही गुन्हा दाखल झाल्यापासून बेपत्ता झाले. मात्र माहिती मिळताच वपोनि प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि समीर शेख आणि त्यांच्या पथकाने बदलापूर परिसरात सापळा लावून आदित्य रेडीज याला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *