अविनाश उबाळे
ठाणे : पोटापाण्यासाठी सातासमुद्रापलिकेकडून मुंबईत आले. हाताला काम मिळाल्याने कुटूंबियांच्या उदनिर्वाहाचा प्रश्न सुटल्याने कामगारांच्या चेह-यावर आनंद होता. पण ३१ जूलैची रात्र ही त्या कामगारांसाठी अखेरची रात्र असेल असे त्यांना वाटलेही नसेल. समृध्दी महामार्गावरील शहापूरजवळील सरलांबे गावानजीक पुलाच्या लॉचिंग गर्डर व क्रेन कोसळल्याने २० कामगारांचा मृत्यू झाला आहे. ती रात्र त्या कामगारांसाठी काळरात्रच ठरली…
मुंबई नागपूर समृद्ध महामार्गावर अपघाताची मालिका सुरू असून अखेरच्या तिसऱ्या टप्प्यातील सुरू असलेल्या शहापूर तालुक्यातील सरलांबे गावाजवळील खुटाडी गावाजवळ लाँचिंग गर्डर व क्रेन (सेगमेंट लाँचर) गर्डरसह ३५ मीटर उंचीवरून अचानक खाली कोसळली. या झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत वीस कामगारांचा गर्डर व क्रेन खाली चिरडून जागीच मृत्यू झाला आहे.तर या अपघातात तीन कामगार गंभीर जखमी झाले असून यातील दोन जणांवर ठाणे ज्युपिटर येथे तर एका जखमीवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मृतांमध्ये समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदार कंपनीतील चार अभियंत्यांचा समावेश आहे. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही दुर्दैवी अशी दुर्घटना घडली ही रात्र कामगारांसाठी अखेरची काळरात्र ठरली आहे.
३१ जुलै २०२३ रोजी रात्री ११.३० वाजता लाँचिंग गर्डर सूरु असताना क्रेन (सेगमेंट लाँचर) पूर्ण झालेल्या गर्डरसह ३५ मीटर उंचीवरून पियर क्र. १५-१६ मध्ये अचानक कोसळली. सदर ठिकाणी सुमारे १७ कामगार, ०४ अभियंते व ०७ कर्मचारी असे एकूण २८ जण दुसऱ्या दिवसाची पूर्व तयारी करण्यासाठी गेले होते.
त्यापैकी या दुर्घटनेत १३ कामगार, ०२ अभियंते व ०५ कर्मचारी असा एकूण २० जणांचा मृत्यू झाला असून ०३ गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी ०२ ज्युपिटर रुग्णालयात तर ०१ शहापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच ०५ जण सुरक्षित आहेत. मृत्यु पावलेल्या पैकी उत्तर प्रदेश येथील ८, बिहार ५, प. बंगाल ४, तामिळनाडू ०२ उत्तराखंड ०१ या राज्यातील व्यक्तींचा समावेश आहे.
मृत्युमुखी पडलेले हे सर्व कामगार उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तराखंड, या राज्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, तातडीने मदतीसाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या आणि डॉग स्कॉड देखील घटनास्थळी पोहचले मंगळवारी सायंकाळी उशिरा पर्यंत बचाव कार्य सुरू होते.
मृतांची नावे
नितीनसिंह विनोद सिंह (वय 25, रा. रसरा, बलिया, उत्तर प्रदेश )
आनंद कुमार चंद्रमा यादव, (वय 25, रा. गौरा मदनपुरा, एकेल, बलिया, उत्तर प्रदेश -),
लल्लन भुलेट राजभर (वय 38, रा. देहारी, कटवारी, बलिया, रसरा, उत्तरप्रदेश ),
राधे श्याम भीम यादव (वय 40, रा. गौरा मदनपुरा, नागरा, बलिया, उत्तर प्रदेश ),
सुरेंद्र कुमार हुलक पासवान (वय 35, रा. विल-माली अरवल, बिहार ),
पप्पू कुमार कृष्णदेव साव, (वय 30, रा. विल-माली, ठाणे-बंशी, अरवल, बिहार )
गणेश रॉय (वय 40, रा. पश्चिम डौकीमारी, गरियालतारी, जलपाईगुडी, पश्चिम बंगाल )
सुब्रोतो धिरेन सरकार (वय 23, रा. धौलागुरी, चारेर बारी, जलपाईगुडी, पश्चिम बंगाल )
लवकुश कुमार राम उदित साव (वय 28, रा. ग्राम एन पोस्ट-माली, अरवल, बिहार )
मनोज सिंह इंद्रदेव यादव (वय 49, रा. नंदन, बक्सर, डुमराव, बिहार)
राम शंकर यादव (वय 43, उत्तरप्रदेश),
सत्य प्रकाश पांडे (वय 30, बिहार)
सरोजकुमार (वय 18, उत्तर प्रदेश)
जखमींवर उपचार सुरू, प्रकृती स्थिर
प्रेम प्रकाश अयोध्य साव (वय 37) यांच्या पायाला दुखापत झाली असून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर किशोर हिव (वय 40) व चंद्रकांत वर्मा (वय 36) या दोघा जखमींना ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
-सध्या कामाची स्थिती
समृद्धी महामार्गचे ७०१ किमी पैकी ६०० किमी चे काम पूर्ण झालेले असून हा महामार्ग वाहतुकीस खुला करण्यात आलेला आहे.उर्वरित नाशिक व ठाणे जिल्ह्यातील १०१ किमीचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात येत आहे.शहापुर तालुक्यातील सरलांबे किमी ६६७/३०० येथे सुमारे २.२८ किमी लांबीच्या व्हायडक्ट पुलाचे काम सुरु आहे.या पुलाचे बांधकाम अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येत असून बांधकामाकरीता कंत्राटदार मे. नवयुगा इंजीनियरिंग कंपनी ने व्ही.एस.एल इंडिया कंपनीला हे काम दिलेले आहे.कंपनीचे स्वयंचलीत लाँचर वापरण्यात येत असून याचे वजन ७०० मे. टन इतके आहे.या स्वयंचलीत लाँचरमार्फत एकूण ११४ गाळ्यांपैकी ९८ गाळ्यांचे बांधकाम या कंपनीने आत्तापर्यंत पूर्ण केलेले आहे