मुंबई, दि. २०ः देशासह राज्यात कोरोनाचा जेएन-१ हा नवा विषाणू आढळून आल्याने धाकधूक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्टमोडवर आले असून आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन आरोग्य मंत्र्यांनी केले आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेने देखील नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्रिसूत्री नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाने डोकेवर काढल्याने चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने एक निवदेन जारी करत, कोरोनाच्या नव्या विषाणूचा जेएन-१, व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट असे वर्गीकरण केले असून जेएन -१ हा ओमिक्रॉन व्हेरीयंटचा उपप्रकार असल्याचे म्हटले आहे. रुग्णांमध्ये या विषाणूची सौम्य लक्षणे आढळून येतात. त्यामुळे या व्हेरीयंटची भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र, आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्वांनी कोविड प्रतिबंधासाठी मास्क वापरा, वारंवार हात धुणे, गर्दीत फिरताना काळजी घेणे या त्रिसूत्री नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
केरळमध्ये या विषाणूचा पहिला रुग्ण
भारतात केरळमध्ये या विषाणूचा पहिला रुग्ण आढळला होता. हा रुग्ण पूर्णतः बरा झाला आहे. तर महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४१ वर्षीय रुग्णाला या विषाणूची लागण झाली आहे. या नवीन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हयांना दक्षता घ्यावी. तसेच रुग्णांचे सर्वेक्षण करावे. सर्वेक्षणा बरोबरच सर्व जिल्ह्यांत कोविड चाचण्या वाढवा, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच केंद्र सरकारच्या सूचनेनुसार पूर्वतयारीसाठी रुग्णालयातील उपलब्ध खाटा, आयसीयु, सुविधा, यंत्रसामुग्री, ऑक्सिजन सुविधा, औषध साठा, मनुष्यबळ, मनुष्यबळाचे प्रशिक्षण, टेलिमेडीसीनचा आढावा घेण्यात आला.
जेएन-१ या कोविडच्या नव्या विषाणूच्या बाबत काळजी घेण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. कुणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. याबाबत काही लक्षणे आढळल्यास वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घेऊन औषधे घ्यावीत. याशिवाय कोविड संबंधित नियमावलीचे पालन करा, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रा . डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे.
रुग्णालयात मॉकड्रील..
महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवली असून जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थाचे जिल्हा स्तरावर नोडल अधिका- यांची नेमणूक करून मॉकड्रील करण्यात आले आहे. राज्यातील ६५५ शासकीय रुग्णालय, ५७५ खाजगी रुग्णालये, शासकीय आणि खाजगी वैद्यकीय १४ महाविद्यालये, ६ इतर अशा सुमारे १२६४ संस्थांनी मॉकड्रील पूर्ण
आरोग्य यंत्रणा तैनात
राज्यातील रुग्णालयात २३२९५ आयसोलेशन बेड्स, ३३४०४ ऑक्सिजन बेड्स, ९५२१ आय.सी.यु. बेड्स, ६००३ व्हेंटीलेटर बेड्स कार्यान्वित केले आहेत. तर २३७०१ डॉक्टर, २२३३० कोविड प्रशिक्षित डॉक्टर्स, २५५९७ नर्सेस, २२३२४ प्रशिक्षित नर्सेस, १०२३६आरोग्य कर्मचारी, ९१०१ प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी, ८२५८ आयुष डॉक्टर्स, ७९९२ प्रशिक्षित आयुष डॉक्टर्स इतके मनुष्यबळ राखीव ठेवले आहेत. तर कोविड चाचण्या करण्यासाठी ३२६२८० आरटीपीसीआर कीट्स, १६०८६३१ रॅपीड ऍटीजन कीट्स उपलब्ध असल्याचे आरोग्य संघटनेच्या निवदेनात नमूद केले आहे.