नवी दिल्ली : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांची मतमोजणी रविवार, ३ डिसेंबर रोजी होणार असून मिझोरामची मतमोजणी सोमवारी ४ डिसेंबर रोजी होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांची रंगीत तालिम ओळखल्या जाणा-या या निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरम या पाच राज्यांत गेल्या दोन महिन्यांत निवडणुकांचा धुराळा उडाला. आरोप प्रत्यारोप आश्वासांची खैरात पाहावयास मिळाली. महाराष्ट्रातील अनेक नेते या राज्यांमध्ये प्रचारात सहभागी झाले होते. दरम्यान, ३० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून आता उद्या (३ डिसेंबर) मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

मतदान प्रक्रिया पार पडलेल्या पाचही राज्यांत अटीतटीची लढत झाली. पाचही राज्यांमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी थेट लढत आहे. राजस्थानमध्ये आतापर्यंत एकच सरकार सलग १० वर्षं राहिलेलं नाही. त्यामुळे भाजपाला यंदा राजस्थानमध्ये आशा असताना दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये २०२० मध्ये सत्तानाट्यात सत्ता गमावल्यानंतर काँग्रेस पुन्हा सत्तारूढ होण्यासाठी उत्सुक आहे. छत्तीसगडमध्ये बघेल सरकारनं ग्रामीण भागात, विशेषत: आदिवासी व शेतकरी समाजासाठी केलेल्या कामांचा काँग्रेसला फायदा होणार का ? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तिकडे तेलंगणामध्ये बीआरएसच्या नव्या मॉडेलला जनता पुन्हा कौल देईल की काँग्रेस मुसंडी मारेल, याकडेही राजकीय जाणकारांचं लक्ष राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!