ठाणे, दि. २ (प्रतिनिधी) : बिल्डरकडून तब्बल २० वर्षांपूर्वी ताब्यात घेतलेल्या तब्बल ९ हजार ५१० चौरस मीटर जागेवर आता महापालिकेकडून फलक लावण्याबरोबरच कुंपण घालण्यात येणार आहे. भाजपाच्या नगरसेविका अर्चना किरण मणेरा यांच्या पाठपुरावा आणि आंदोलनानंतर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आठ दिवसांत फलक व कुंपण घालण्याचे आश्वासन दिले. या जागेवर खेळाच्या मैदानाचे आरक्षण असल्यामुळे, घोडबंदरवासियांना नवे प्रशस्त मैदान उपलब्ध होणार आहे.
कोलशेत येथील सेक्टर ५ मधील महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यातील आरक्षीत असलेल्या खेळाच्या मैदानासाठी आरक्षण क्र. ४ च्या क्षेत्रापैकी ९ हजार ५१० चौ. मी. क्षेत्र महापालिकेच्या ताब्यात घेण्यात आले होते. २००२ पासून या जागेच्या सातबारा उताऱ्यावर महापालिकेच्या नावाची नोंद झाली आहे. मात्र, या जागेला कंपाऊंड व खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असल्याचा फलक लावण्यात हेतुपुरस्सर दिरंगाई केली जात आहे. या विषयावर भाजपाच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांच्याकडून महासभेतत प्रशासनाला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी लेखी उत्तरात संबंधित मैदानाला कंपाऊंड व तेथे फलक लावण्याची माहिती देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात मैदानाच्या ठिकाणी फलक वा कुंपण उभारण्यात आले नव्हते. महापालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांकडून हेतुपुरस्सर खोटी माहिती देऊन दिशाभूल केले जात होते.
या संदर्भात नगरसेविका अर्चना किरण मणेरा यांनी आयुक्त डॉ. शर्मा यांना २८ नोव्हेंबर रोजी फलक व कुंपण घालण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा पत्राद्वारे दिला होता. मात्र, त्या पत्राबाबत काहीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे नगरसेविका मणेरा यांच्या नेतृत्वाखाली नागरीकांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर आज धरणे आंदोलन केले. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी तातडीने मैदानाच्या आजच मार्किंग करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर येत्या आठ दिवसात खेळाच्या मैदानाचा फलक लावून मैदानाला कुंपण घालणार असल्याचे आश्वासन दिले. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, भाजपाचे कोकण प्रभारी व आमदार रविंद्र चव्हाण, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली आजचे आंदोलन करण्यात आले.
२० वर्षांपासून खेळापासून वंचित
ठाणे महापालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे, घोडबंदर रोड परिसरातील खेळाडूंना २० वर्षांपासून खेळाचे मैदान उपलब्ध झाले नाही, याबद्दल नगरसेविका अर्चना मणेरा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विकासकाच्या हितासाठी अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात होते, असा आरोप मणेरा यांनी केला. त्याचबरोबर आता खेळाचे मैदान उपलब्ध होणार असल्याबद्दल समाधानही व्यक्त केले.